सुषमा अंधारेंनी थेट हडपसरचा उमेदवारच सांगून टाकला, प्रशांत जगतापांनी दिली खोचक प्रतिक्रिया
पुणे: हडपसरची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची असून हडपसर विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे महादेव बाबर हे निवडणूक लढवतील, अशी घोषणाच शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर हे निवडणूक लढवतील असं त्यांनी जाहीर केलं. पुण्यात त्या माध्यमांशी बोलत होत्या. अंधारे यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमधील शरद पवार गटाला धक्का बसला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाकडून तयारीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघात मात्र महाविकास आघाडीमध्येच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यमान आमदार चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्यामुळे हा मतदार संघ महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडे राहील असे बोलले जात होते. साधारणत: ज्या मतदारसंघात जो आमदार त्याच पक्षाला ती जागा सोडली जाणार असे उमेदवारी देण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळेच या मतदारसंघामधून प्रशांत जगताप हे अनेक दिवसांपासून तयारी करत आहे. मात्र आज सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत हडपसर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचे महादेव बाबर लढवतील अशी घोषणाच केली. त्यामुळे हडपसरमध्ये महाविकास आघाडी मधील दोन्ही पक्षांमध्येच आता उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे या महाराष्ट्रातील मोठ्या नेत्या आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आधी त्यांच्याकडे उमेदवारांची यादी आली असावी. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारात ही घोषणा केली असावी, अशी उपरोधिक प्रतिक्रिया जगताप यांनी दिली. जगताप पुढे म्हणाले, उमेदवारी जाहीर करण्याचा सर्वस्वी अधिकार हा महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. येत्या आठवड्यात हे सर्व पक्ष आधी महाविकास आघाडीची घोषणा करतील. त्यानंतर कुठल्या जागा कुठल्या पक्षाला मिळाल्या ते जाहीर करतील. त्यानंतर जोतो पक्ष आपले उमेदवार जाहीर करेल. मला खात्री आहे की महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबतीत योग्य तो निर्णय घेतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.