प्रधान होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता व्यक्त केली जात आहे. कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतील व्यक्तीचे नाव चर्चिले जात आहे तर कधी मोदींच्या मर्जीतील व्यक्तीच अध्यक्ष होणार अशा वावड्या उठल्या आहेत.

BJP,national president,Rashtriya Swayamsevak Sangh,Modi,

हरयाणातील विजयाचे बक्षीस, मोदींची मर्जी सांभाळण्यात कुशल

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता व्यक्त केली जात आहे. कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मर्जीतील व्यक्तीचे नाव चर्चिले जात आहे तर कधी मोदींच्या मर्जीतील व्यक्तीच अध्यक्ष होणार अशा वावड्या उठल्या आहेत. मात्र आता हरयाणातील विजयाचे शिल्पकार असलेल्या केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर आले आहे.

कुशल संघटनात्मक कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र प्रधान यांना पंतप्रधान मोदींच्या 'उज्ज्वला मॅन' म्हणून ओळखले जाते. 'उज्ज्वला गॅस कनेक्शनच्या माध्यमातून देशातील गोरगरिबांना गॅस देण्याचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न पेट्रोलियम मंत्री म्हणून त्यांनी पूर्ण केले. एनईटी-एनईईटी पेपर-लीक पेचप्रसंग सोडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ओडिशातील उत्कल विद्यापीठातून प्रधान यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ५५ वर्षांचे धर्मेंद्र प्रधान गेल्या एक दशकांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे प्रमुख सहकारी आहेत. प्रधान ओडिशातील भाजपचा प्रमुख चेहरा आहेत. ओडिशा विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा प्रचार दोन मुख्य मुद्यांवर केंद्रित केला होता. प्रधान यांनी निश्चित केलेल्या या दोन मुद्यांचा भाजपाला फायदा झाला. राज्यातील नवीन पटनाईक यांची २४ वर्षांची सत्ता संपुष्टात आली.

धर्मेंद्र प्रधान यांनी २०१९ प्रमाणेच २०२४मध्येही हरियाणामधील भाजपाच्या निवडणूक रणनितीचे व्यवस्थापन, दैनिक कार्य आणि जाहीरनामा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. धर्मेंद्र प्रधान यांनी १९८३ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कामांना सुरुवात केली. त्यांनी २००० साली पल्लालहारमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली.

२००४ मध्ये देवगढ लोकसभा मतदारसंघातील ते भाजपचे उमेदवार होते. २००९ मध्ये ते पराभूत झाले. पण, २०१० साली त्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. २०१२ साली त्यांची बिहारमधून राज्यसभेवर निवड झाली. २०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ओडिशातील संबळपूर मतदारसंघातून एक लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ धर्मेंद्र प्रधान यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest