संग्रहित छायाचित्र
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. तसेच या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये तळ ठोकला आहे. बीडच्या शासकीय कार्यालयांमध्ये वरिष्ठ पदांवरील लोक हे परळीतील वंजारी समाजातील असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांना वंजारी समजाकडून रोष पत्करावा लागत आहे. दमानिया यांना सातत्याने धमकीचे फोन येत असून हे लोक पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थक असल्याचा दावा दमानिया यांनी केला त्यानंतर त्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अंजली दमानिया म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी बीडच्या वरिष्ठ पदावर सर्व वंजारी समाजाची लोक आहेत असे विधान केले होते. ही गोष्ट मला अभ्यासातून समजली. वंजारी समाजाच्या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रशासनात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना बीड येथे बोलवण्यात आले. मी समाजाच्या विरोधात बोलले नव्हते. भगवान बाबा यांच्यासारखे संत शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रबोधन करायचे. ते मला वंदनीय आहे. हा समाज कष्टाळू नाही किंवा आळशी आहे असे मी कधीही म्हटले नाही. अगदी गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून परळीतील सर्व महत्त्वाच्या प्रशासकीय पदावर वंजारी समाजातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. मी संपूर्ण जातीविरोधात बोलले नव्हते. मात्र वंजारी समाजाचा मुंडे कुटुंबाकडून वापर केला जात आहे. उच्च पदावरील लोक माणसं फक्त परळीमधीलच का? असा माझा सवाल होता असे अंजली दमानिया म्हणाल्या.
बीड जिल्ह्यात शासनाकडून जारी करण्यात आलेल्या बिंदू नामावली प्रमाणे अधिकाऱ्यांच्या नेमणुका होत नाहीत, असाही आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
मला सातत्याने फोन येत आहेत. तसेच फेसबुक वर माझ्याबद्दल काही पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट मध्ये माझ्याबद्दल खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे. मला पहिल्या दिवशी ७०० ते ८०० फोन आले. माझे फोटो समाज माध्यमांवर शेअर करून अश्लील कॉमेंट्स केल्या जात आहेत . हे सगळे लोक धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत असा दावा दमानिया यांनी केला आहे.