संग्रहित छायाचित्र....
Maharashtra Politics (छत्रपती संभाजीनगर) | आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा हालचालींना वेग आला आहे. यादरम्यान, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे शिवसेनेचे माजी महापौर नंदकुमार घोडीले आणि त्यांच्या पत्नी अनिता घोडीले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि ठाकरेगटाला रामराम ठोकला.
जवळपास 30 वर्षापासून नंदकुमार घोडीले शिवसेनेत कार्यरत होते. यादरम्यान नंदकुमार घोडीले आणि त्यांच्या पत्नीला शिवसेना(ठाकरे गट) पक्षाने महापौरपद दिले होते. पक्षातील फुटीनंतर घोडेले यांनी उद्धव ठाकरेंची साथ कायम ठेवली परंतु आता त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वात धनुष्यबाण हाती घेतले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेले समाजसेवेचे व्रत जपत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील आपली शिवसेना यशस्वी घोडदौड करत आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी… pic.twitter.com/sh3ExmNIRw
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) January 3, 2025
विधानसभा निवडणूक लढवण्यासही दिला होता नकार....
माजी महापौर किशनचंद तनवाणी, ज्यांना शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात विधानसभा 2024 निवडणूकीसाठी तिकिट मिळाले होते. पण ऐनवेळी, तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने उद्धव ठाकरे गटाने घोडीले यांना त्यावेळी निवडणूक लढविण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी, त्यांनी निवडणूक लढवण्यासही नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी आता शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनीही या पक्षप्रवेशासाठी विशेष प्रयत्न केल्याचे समजते.
एकनाथ शिंदे यांच्या प्रभावामुळे शिवसेनेत ...
नंदकुमार घोडीले यांनी सांगितले की, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विकासकामे आणि त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला आहे." ते म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून शिवसेनेची चळवळ पुढे जात आहे. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन अनेक शिवसैनिकांनी आम्हाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, "माझा उद्धवसेनेतील कुणावरही राग नाही. मातोश्रीचे आशीर्वाद आम्हाला कायम मिळाले. मी उद्धव ठाकरेंचे उपकार विसरणार नाही. मात्र विधानसभेत लोकांनी नाकारल्यामुळे आता शहराच्या प्रगतीसाठी आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे"
शिवसेनेची ताकद आणखी वाढणार - उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा विश्वास व्यक्त केला की, "नंदकुमार घोडीले आणि अनिता घोडीले यांच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका जवळ आल्याने घोडले यांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देशही त्यांनी दिले." यावेळी बोलताना शिंदे यांनी पक्षाच्या विस्तारासाठी आवश्यक ती मदत सरकारच्या माध्यमातून केली जाईल, असेही स्पष्ट केले.