Maharashtra | राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार? शिवसेना-UBT ने CM फडणवीसांचे केले कौतुक, संजय राऊत म्हणाले "आम्ही त्यांचे..."

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतरही इथल्या राजकारणात चांगलीच खलबते सुरू आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याची चर्चा सध्या चर्चेत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 3 Jan 2025
  • 11:24 am
Maharashtra Politics,

संग्रहित छायाचित्र....

Maharashtra Politics News : महाराष्ट्रात शिवसेना (UBT) आणि भाजप यांच्यातील वाढत्या जवळीकीची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रात संगीत नेहमीच असते. राजकारणातही सूर आणि ताल नेहमीच असतो. आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक केले आहे, कारण त्यांनी चांगले काम केले आहे."

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सामना अग्रलेखात देवेंद्र फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्यावरुन करण्यात आलेल्या कौतुकावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, "महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात नक्षलवादी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात आले, तर आम्ही त्याचे स्वागत करतो. तसेच देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली हे कोलार शहरासारखे बनवायचे आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या निर्णयाचे स्वागत करतो."

"नक्षलवादात हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला. जमशेदपूरनंतर गडचिरोलीला पोलाद सिटी बनविले जात असेल आणि तिकडच्या बेरोजगारांच्या हाती काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल, तर ते या राज्याच्या हिताचं असेल. नक्षलवाद नष्ट होणार असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं असेल तर ते विधायक आहे.त्याबदल  त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं आपल्या सर्वांचं काम आहे आणि आम्ही तेच केलं”, असेही संजय राऊत म्हणाले.

शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, "सामना'ची परंपरा राहिली आहे, समोरचा कट्टर विरोधक असला तरी, कोणी देशहितासाठी काम करत असेल, तर सामना त्याला उचलून देशासमोर आणतो, त्याचे कौतूक करतो. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही आम्ही तेच केले आहे आणि राजकारणात एकमेकांवर टीका-टिप्पणी होतच असते अन् होतच राहणार आणि विरोधी पक्षाची जी जबाबदारी असते ती आम्ही वेळोवेळी पार पाडूच. राज्याच्या विकासामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे काम मोठं असावं लागतं, असेही ते म्हणाले."

ते पुढे म्हणाले की, " त्यांनी एखाद्या चांगलं पाऊल उचललं असेल आणि राज्याची कायदा सुव्यवस्था सामाजिक समीकरणे यांना दिशा देणार असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्यांचे कौतुक केले पाहिजे. यात जवळीक साधण्याचा प्रयत्न काय आहे. शिवसेना संस्कार संस्कृती आणि शिष्टाचार या त्रिसूत्रीवर काम करणारा पक्ष आहे. ही भूमिका शिवसेनेची हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे."

दरम्यान, जहाल नक्षलवादी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह 11 नक्षल्यांनी नुकतेच गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अभिनंदन केले आहे.

 

Share this story

Latest