देवेंद्र फडणवीस हे 'फेक नरेटीव्ह'चं चालतं बोलतं केंद्र, सुषमा अंधारेंची घणाघाती टिका

पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टिका केली. फडणवीस हे फेक नरेटीव्हचं चालतं बोलतं केंद्र असल्याची टिका अंधारे यांनी केली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Mon, 22 Jul 2024
  • 01:07 pm
Devendra Fadanvis, Fake Narrative, Sushma Andhare, Pune, BJP, Shiv Sena UBT

संग्रहित छायाचित्र

पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टिका केली. फडणवीस हे फेक नरेटीव्हचं चालतं बोलतं केंद्र असल्याची टिका अंधारे यांनी केली. पुण्यात रविवारी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन झाले. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी आज (२२ जुलै) पत्रकार परिषद घेतली. 
 
सुषमा अंधारे म्हणाल्या,  देवेंद्र फडणवीस यांचं कालचं भाषण हे फेक नरेटीव्हचं केंद्र किती मोठं असू शकतं याचा धडधडीत पुरावा आहे. कालच्या भाषणात फडणवीसांनी म्हटलं की ठाकरेंना आरक्षण टिकवता आलं नाही. जर ठाकरेंना महाराष्ट्रात आरक्षण टिकवता आलं नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर बिहार मध्ये भाजपाचं डबल इंजिनचं सरकार होतं. मग त्यांना तिथे आरक्षण का टिकवता आलं नाही? महाराष्ट्रात भाजपाला आरक्षण द्यायचं नसल्याने ते गोंधळाची स्थिति निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अंधारे म्हणाल्या. 

अंधारे म्हणाल्या, फडणवीस म्हणाले की डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेत आरक्षणाची कालमर्यादा दहा वर्षांची ठेवली होती.    ते असंही म्हणाले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आरक्षणाची मर्यादा दहा वर्षांनी वाढली.  माझी अशी समजूत होती की फडणवीस हे फार हुशार आहेत. ते प्रचंड अभ्यास करतात. आणि त्यांना प्रत्येक गोष्टींची माहिती असते. पण काल ते निखालसपणे खोटं बोलत होते. फडणवीस साहेब आपल्याला हवं असेल तर कायद्याची पुस्तके मी आपल्याला आणून देते. 

अंधारे पुढे म्हणाल्या, भारतीय राज्यघटनेत राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक या तीन प्रकारची आरक्षण आहे. त्यापैकी राजकीय आरक्षण दहा वर्षासाठी ठेवले होते. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही कालमर्यादा नव्हती. राजकीय आरक्षणाची १० वर्षांची मर्यादा वेळोवेळी वाढवली गेली. यावेळी भाजपा बाल्यावस्थेत होता. अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १० वर्षे आरक्षण वाढवण्याशी सूतराम संबंध नाही. राहिला प्रश्न सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाचा. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. हे राज्यघटनेच्या फ्रेमवर्कमध्ये सांगितलं आहे. याचा अभ्यास फडणवीस यांनी करावा असा सल्ला अंधारे यांनी फडणवीस यांना दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest