संग्रहित छायाचित्र
मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद उमटत असून सत्ताधारी भाजपने ही घटना बनावट असल्याचा आरोप केला आहे. भाजपच्या या आरोपाला सलील देशमुखांसह महाविकास आघाडीने प्रत्युतर दिले असून भाजपनेच हल्ला घडवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, अनिल देशमुखांवरील हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हे केवळ रजनीकांतच्या चित्रपटातच हू शकते, अशा शब्दांत चिमटा काढला आहे.
दगड मागून लागला तर पुढे कशी जखम झाली? असा प्रश्नही त्यांनी विचारला. बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस आयुक्तांनी घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. यामुळे तिथले चित्र स्पष्ट झाले आहे. आता प्रश्न निर्माण झाला आहे की, दहा किलो गोटा विंडशिल्डवर मारला तर विंडशिल्ड तुटली का नाही? बॉनेटला साधा स्क्रॅचही पडलेला नाही. एकच गोटा आतमध्ये दिसत आहे. हा गोटा मागची काच फोडून मारला आहे. मागच्या काचेतून दगड मारला तर मागे दगड लागला पाहिजे. तो समोर कसा लागला. असा दगड फक्त रजनीकांतच्या पिक्चरमध्ये मारला जाऊ शकतो, जो मागून मारला तरी गोल फिरून समोर येऊन डोक्याला लागतो. एक किलोचा दगड लागला तर फक्त खुना का आहेत, जखम का दिसत नाही. यातून एकदम स्पष्ट होत आहे की हा सिनेमा तयार करण्यात आलाय, असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला.