राज्यातील ६२ टक्के आमदारांवर गुन्हे, बहुतांश उमेदवार करोडपती, स्वच्छ चारित्र्य अन् जनहिताची अपेक्षा केराच्या टोपलीत

मुंबई : लोकसभेच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगळी असते. स्थानिक प्रश्न, मतदारसंघातील समस्यांना वाचा फोडणारे लोक आमदार म्हणून विधानसभेत निवडून जात असतात. रस्ते, पाणी, वीजपुरवठा आणि स्थानिक अशा मुद्यांवर ही निवडणूक लढवली जाते.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : लोकसभेच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगळी असते. स्थानिक प्रश्न, मतदारसंघातील समस्यांना वाचा फोडणारे लोक आमदार म्हणून विधानसभेत निवडून जात असतात. रस्ते, पाणी, वीजपुरवठा आणि स्थानिक अशा मुद्यांवर ही निवडणूक लढवली जाते. या प्रश्नांना हात घालणारा आणि मतदारांना उपलब्ध होऊ शकणारा स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आमदार व्हावा, असे अपेक्षित असते. प्रत्यक्षात हे सगळे मुद्दे बाजूला पडून दामाजीपंत आणि अंगावर गुन्हे घेणारे लोक आमदार बनलेले दिसतात. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेच्या अहवालातील आकडेवारीच हे सिद्ध करते.      

राज्यातील आमदारांचे शिक्षण, सांपत्तीक स्थिती, त्यांच्यावर दाखल गुन्हे याबाबत ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मस’ (एडीआर) यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत २८८ मतदारसंघातून तब्बल तीन हजार १३८ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये २३७ (८ टक्के) महिला उमेदवार होते. निवडणुकीत उभे राहिलेल्यांपैकी ३० टक्के म्हणजेच ९३२ उमेदवारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. यातील २० टक्के म्हणजेच ६१८ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. तर एक हजार १९ (३२ टक्के) उमेदवार करोडपती होते. मावळत्या विधानसभेतील बहुतांश म्हणजेच ९३ टक्के आमदार करोडपती असून, राज्यात सर्वांत श्रीमंत असलेले भाजपचे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार पराग शहा यांना अजूनही भाजपाने उमेदवारी दिलेली नाही. विशेष म्हणजे मावळत्या विधानसभेतील तब्बल ६२ टक्के आमदारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. निवडणूक लढवलेल्या एकूण उमेदवारांपैकी ४१ टक्के म्हणजेच एक हजार १९३ उमेदवार पदवीधर होते. या निवडणुकीनंतर विजयी झालेल्या म्हणजेच विद्यमान आमदारांपैकी १७७ (६२ टक्के) आमदारांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, त्यातील ४० टक्के आमदारांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहेत. विद्यमान आमदारांपैकी ५५ टक्के आमदार पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत एकूण २४ महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या.

मावळत्या विधानसभेतील सर्वांत श्रीमंत आमदार भाजपाचे पराग शहा असून त्यांची एकूण मालमत्ता ५०० कोटींपेक्षा अधिक आहे. त्या खालोखाल विद्यामान मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मालमत्ता ४४१ कोटींपेक्षा अधिक असून तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे सांगलीचे आमदार विश्वजित कदम (२१६ कोटी) होते. सर्वाधिक ३२ गुन्ह्यांची नोंद अपक्ष आमदार बच्चू कडू (अचलपूर) यांच्यावर दाखल होते. त्याखालोखाल बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), जितेंद्र आव्हाड (कळवा- मुंब्रा) २५, विकास ठाकरे (नागपूर) २५ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी) आणि गणपत गायकवाड (कल्याण) यांच्यावर प्रत्येकी १८ गुन्हे दाखल होते.

आमदारांनी निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्राद्वारे ही माहिती जाहीर केली होती. यातील बहुतांश आमदार पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात असून त्यांची मालमत्ता आणि त्यांच्यावरील गुन्हे यात किती बदल झाला आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१९ च्या निवडणुकीत उभे राहिलेल्यांपैकी ३० टक्के म्हणजेच ९३२ उमेदवारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. यातील २० टक्के म्हणजेच ६१८ उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest