पडद्याआडून ! काँग्रेस+ठाकरे सेना=दिल्ली

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाचे उज्ज्वल निकम यांच्यात झालेली लढत ही मुंबईतील लढतींपैकी एक हायप्रोफाईल लढत म्हणावी लागेल.

Varsha Gaikwad

संग्रहित छायाचित्र

सर्व पक्षांना संधी देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मुंबई उत्तर मध्यने यावेळी काँग्रेसला संधी दिली. सलग दोन वेळा दिल्ली गाठणाऱ्या भाजपच्या पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्याचा प्रयोग येथे यशस्वी झाला नाही. काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या मतांच्या जोरावर वर्षा गायकवाड यांनी दिल्ली गाठली.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आणि भारतीय जनता पक्षाचे उज्ज्वल निकम यांच्यात झालेली लढत ही मुंबईतील लढतींपैकी एक हायप्रोफाईल लढत म्हणावी लागेल. भाजपने राजकारणात नवख्या असलेल्या पण सामान्यांना परिचित असलेल्या उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्याने या लढतीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहणारे निकम यांचा मुंबई किंवा मतदारसंघाशी थेट संबंध नाही. प्रचारात त्यांच्यावर  उपरा अशीच टीका झाली. 

कसा आहे मतदारसंघ?  

हा मतदारसंघ खरे तर कोणत्याच पक्षाचा दबदबा असणारा मतदारसंघ नाही. उजव्या, डाव्या, मध्यममार्गी समजल्या जाणाऱ्या सर्व पक्षांना येथील मतदारांनी संधी दिलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात समाजातल्या विविध स्तरातील, विविध आर्थिक-सामाजिक स्तरातील लोक राहात असल्याने सर्वात जास्त धार्मिक विविधता येथे दिसून येते. एकीकडे बीकेसीसारखं आर्थिक केंद्र, परदेशी कंपन्या आणि बँकांची कार्यालये तर दुसरीकडे झोपडपट्टी इतकी मोठी विविधता येथे दिसून येते. चाकरमानी, उद्योजक, फिल्म क्षेत्रात काम करणारे लोकही येथे राहतात आणि मुंबईचे एक अंगभूत वैशिष्ट्य असलेले कोळीवाडेही आहेत. मेट्रोची कामं, नवे रस्ते, नव्या पुलांची कामे येथे सुरू असल्यामुळे भविष्यातले अनेक प्रश्न सुटणार असले तरी सध्या प्रदूषण, वाहतूक कोंडी अशा समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.

राजकीय बलाबल

या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील विलेपार्लेमध्ये भाजपाचे पराग अळवणी, चांदिवलीमध्ये शिंदे सेनेचे दिलीप लांडे, कुर्ल्यातून शिंदे सेनेचे मंगेश कुडाळकर आणि कलिनामधून ठाकरे गटाचे संजय पोतनीस, वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दकी, वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे आशिष शेलार आमदार आहेत. राजकीय बलाबल पाहिले तर भाजप, शिंदे सेनेचे चार आमदार आहेत, तर काँग्रेस, ठाकरे सेनेचा प्रत्येकी एक आमदार आहे. असे असले तरी भाजप किंवा शिंदे सेनेने येथे पक्षाचा उमेदवार देण्याऐवजी शेवटच्या क्षणी आयात केलेल्या उमेदवारास संधी दिली. विशेष म्हणजे काँग्रेसच्या वर्षा गायकवाडही येथून लढायला सुरुवातीला फारशा तयार नव्हत्या. कधी काळी त्यांचे वडील एकनाथ गायकवाड या मतदारसंघातून विजयी झाले होते. ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे यांच्या आग्रहानंतर त्यांनी निवडणूक लढण्यास मान्यता दिली. अखेर काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतदारांचे गणित येथे जमले आणि काँग्रेसला मुंबईतील एक जागा आपल्या पदरात पाडून घेता आली. विशेष म्हणजे ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे याच मतदारसंघात राहात असले तरी त्यांनी  मतदारसंघाची स्थिती पाहून ही जागा काँग्रेसला दिली आणि ती निवडून आणली.       

विविध पक्षांना संधी 

या मतदारसंघातून विविध पक्षांना संधी मिळाली आहे. १९५२ मध्ये काँग्रेसचे नारायण काजरोळकर तर १९५७ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आणि शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे गोपाळ माने यांना संधी मिळाली. (१९५७ ला संयुक्त मतदारसंघ) १९६२ मध्ये काँग्रेसचे  काजरोळकर, १९६७ आणि १९७१ मध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  सहकारी, अनुयायी रामचंद्र भंडारे काँग्रेसकडून विजयी झाले. १९७३ मध्ये त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. नंतरच्या पोटनिवडणुकीत डांगे यांच्या कन्या रोझा देशपांडे भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून विजयी झाल्या. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेसविरोधी लाटेत कम्युनिस्ट पक्षाच्या अहिल्या रांगणेकर, तर १९८० मध्ये जनता पार्टीच्या प्रमिला दंडवते यांना संधी मिळाली. १९८४ मध्ये काँग्रेसच्या लाटेमध्ये काँग्रेसचे शरद दिघे तर १९८९  मध्ये शिवसेनेचे विद्याधर गोखले खासदार झाले. १९९१ मध्ये शरद दिघे यांना परत संधी मिळाली. १९९६ मध्ये शिवसेनेचे नारायण आठवले विजयी झाले, तर १९९८ मध्ये रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले विजयी झाले. आठवले यांच्या विरोधात शिवसेनेचे नारायण आठवले यांनी निवडणूक लढवली होती. १९९९ मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी लोकसभेत गेले. यावेळेस त्यांना केंद्रात मंत्री होण्याची आणि लोकसभेचे सभापती होण्याची संधी मिळाली. २००४ च्या निवडणुकीत त्यांचा काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांनी पराभव केला. २००९ मध्ये प्रिया दत्त येथून लोकसभेत गेल्या. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा सलग दोन वेळा पराभव केला. यावेळी मात्र भाजपने पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारून उज्ज्वल निकम यांना संधी दिली. २०१९ मध्ये भाजपाच्या पूनम महाजन यांना ४ लाख ८६  हजार ६७२ मते मिळाली, तर प्रिया दत्त यांना ३ लाख ५६  हजार ६६७ मते मिळाली. महाजन यांना २०१४ च्या तुलनेत थोडी अधिक मतं मिळाली असली तरी त्यांच्या मतांची टक्केवारी यावेळी कमी झाल्याचे दिसून आले. प्रिया दत्त यांच्या टक्केवारीत मात्र पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसते. विशेष म्हणजे पूलवामानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे राष्ट्रप्रेमाची लाट असतानाही महाजन यांच्या मतात म्हणावी तेवढी वाढ झालेली दिसली नाही. यावेळी त्यांचे मताधिक्य होते १ लाख ३० हजार. २०१४ मध्ये पूनम महाजन यांना ४ लाख ७८ हजार, तर प्रिया दत्त यांना २ लाख ९१ हजार मते मिळाली. यावेळी महाजन यांचे मताधिक्य होते १ लाख ८६ हजार.  २०१९ च्या निवडणुकीआधी काही महिने प्रिया दत्त यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, राहुल गांधी यांची भेट घेऊन चर्चा केल्यावर त्यांनी आपला निर्णय बदलला होता. २०१९ मध्ये विजयी झालेल्या पूनम महाजनांचा मतदारसंघातील संपर्क, त्यांनी केलेली कामे, पक्षाने केलेल्या सर्व्हेतील निष्कर्ष यांचा विचार करून त्यांच्याऐवजी भाजपने नवा उमेदवार दिला. यावेळी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना ४ लाख ४५ हजार, तर भाजपचे उज्ज्वल निकम यांना ४ लाख २९ हजार मते मिळाली. काँग्रेसला साडे सोळा हजारांचे मताधिक्य मिळाले. पूनम महाजन यांच्याकडे २०१४ ला असलेले १ लाख ८६ हजार आणि २०१९ ला असलेले १ लाख ३० हजारांचे मताधिक्य वर्षाताईंनी भरून काढले. 

   'वनमॅन आर्मी'  

राज्य, देशपातळीवर गाजलेले अनेक महत्त्वाचे खटले लढविणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने निवडणूक मैदानात उतरवले. राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू असताना मात्र त्यांनी राजकारण प्रवेशाचा इन्कार केला होता. उज्ज्वल निकम उत्तर-महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका उच्च-शिक्षित कुटुंबातील आहेत. जळगाव जिल्हा न्यायालयात सरकारी वकील असताना त्यांनी अंबरनाथमधील बॉम्बस्फोट खटला हाताळला होता. याचा फायदा त्यांना १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात झाला. सरकारी वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती या खटल्याने. या खटल्यात निकम 'वनमॅन आर्मी' होते. संपूर्ण खटला त्यांनीच चालवला. निकम यांनी सीबीआयचे वकील म्हणूनही काम केलं आहे. १९९३ ला सुरू झालेला मुंबई बॉम्बस्फोट खटला १४ वर्षांनंतर २००७ मध्ये संपला. सुरक्षेसाठी खटल्याच्या सुनावणीवेळी आर्थर रोड तुरुंग परिसराचे कोर्ट बनवले होते. दीर्घकाळ सुरू असलेला हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खटला होता. या खटल्यात १२३ आरोपींपैकी १०० दोषी आढळले, तर १२ दोषींना कोर्टाने फाशी ठोठावली. उज्ज्वल निकम यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने, सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. येण्या-जाण्यासाठी निकम यांना बूलेटप्रूफ गाडी दिली होती. 

आक्रमक अन् प्रसिद्धीचा सोस 

निकम यांचे व्यक्तिमत्त्व  डायनॅमिक आहे, ते आक्रमक असतात. बचाव पक्षाला वरचढ होण्याची एकही संधी देत नाहीत. कायद्याची चांगली जाण आणि प्रत्येक केसचा सखोल अभ्यास यामुळे ९९ टक्के प्रकरणात त्यांना यश मिळाले आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशिवाय गुलशन कुमार हत्या, खैरलांजी हत्याकांड, अंजनाबाई गावित हत्याकांड, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, २००८ मुंबई हल्ला, शक्ती मिल बलात्कार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या, कोपर्डी बलात्कार आदी महत्त्वाचे खटले त्यांनी चालविले. २०१६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा निकम प्रयत्न करतात, अशी टीका त्यांच्यावर होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest