भिंवडी लोकसभा मतदारसंघ : बाळ्यामामांचा जबर दणका!

ठाणे, कल्याणमध्ये शिंदे शिवसेनेला आपला गड राखता आला तरी भाजपाला मात्र लगतच्या भिवंडीत पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोनदा लोकसभा गाठणारे भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले.

Political News

संग्रहित छायाचित्र

सलग दोनदा लोकसभा गाठणारे भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी पराभवाची धूळ चारत दणका दिला.

ठाणे, कल्याणमध्ये शिंदे शिवसेनेला आपला गड राखता आला तरी भाजपाला मात्र लगतच्या भिवंडीत पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोनदा लोकसभा गाठणारे भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी पराभवाचा दणका दिला. भाजपचे दोन विजय वगळले तर काँग्रेसला साथ देणाऱ्या भिवंडी मतदारसंघाने पुन्हा एकदा काँग्रेस विचाराच्या उमेदवाराला दिल्लीत जाण्याची संधी दिली आहे. प्रतिकूल राजकीय स्थिती असतानाही शरद पवार यांनी अचूक डावपेच आखत, राजकीय समीकरणे सोडवत प्रथमच राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला, हे विशेष. 

भावी राजकारण आणि ताकद   

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६ पैकी २ मतदारसंघात शिवसेना, २ मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस, सपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाले. यामुळे भावी राजकारणाची दिशा लक्षात घेऊन कपिल पाटील यांना २०२१ मध्ये मोदी मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद दिले. यावेळी नारायण राणे, हिना गावित यांचीही मंत्रिपदासाठी चर्चा होती. भाजपने ठाणे जिल्ह्यातील पक्ष विस्तार आणि शिवसेनेला रोखण्याचे धोरण डोळ्यासमोर ठेवून पाटील यांना संधी दिली होती. तसेच आगरी समाजात बस्तान बसवणे हाही उद्देश त्यामागे होता. कपिल पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावाचे सरपंच म्हणून झाली. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य पदानंतर ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते राष्ट्रवादीत होते. ठाणे जिल्हा हा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने त्यांना टक्कर देण्यासाठी पाटील यांना पुढे केले. नवी मुंबई विमानतळाला शेकापचे दिवंगत नेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्यावरून आगरी समाज आक्रमक झाल्यावर आगरी मतांचं ध्रुवीकरण करण्याचाही प्रयत्न केला. काही वर्षांपूर्वी कपिल पाटील यांनीच संसदेत नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली होती. ठाणे जिल्ह्यात रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांच्यामुळे भाजपचा असलेला दबदबा शिवसेनेने मोडीत काढला होता. आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांनी पकड मिळवली. मुंबई महापालिकेसाठी नारायण राणे यांना तर ठाणे जिल्ह्यातील महापालिकांसाठी पाटील यांना प्राधान्य देण्याचे भाजपचे धोरण होते

पूर्व इतिहास

भिवंडीत पहिली निवडणूक १९६२ मध्ये झाली तेव्हा काँग्रेसचे यशवंतराव मुकने दिल्लीत पोहोचले होते. त्यानंतर १९६७ आणि १९७१ मध्येही काँग्रेसचेच खासदार निवडून आले. त्यावेळी सोनूभाऊ बसवंत आणि वैजिनाथ धामणकर यांना दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली. १९७१ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ पर्यंत हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. २००९ च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश तावरे यांनी बाजी मारली. तावरे काँग्रेसचे या मतदारसंघाचे चौथे खासदार ठरले. ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यावेळी प्रमुख पाच उमेदवार निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश तावरे यांना १ लाख ८२ हजार, भाजपचे जगन्नाथ पाटील यांना १ लाख ४१ हजार, त्यावेळी हवा असलेल्या मनसेचे देवराज म्हात्रे यांना १ लाख ७ हजार, काँग्रेसचेच पण अपक्ष म्हणून उभे असेलेल विश्वनाथ पाटील यांना ७७ हजार तर सपाचे आर. आर. पाटील यांना ३२ हजार मते पडली होती. या पंचरंगी लढतीत ४१ हजारांच्या आघाडीने तावरे विजयी झाले. २०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोनदा भाजपचे कपिल पाटील दिल्लीत पोहोचले. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना पराभूत करताना १ लाख ९ हजारांचे मताधिक्य घेतले होते. त्यावेळी कपिल पाटील यांना ४ लाख ११ हजार तर विश्वनाथ पाटील यांना ३ लाख १ हजार मते पडली होती. विशेष म्हणजे यावेळी खासदार झालेले सुरेश म्हात्रे यांनी मनसेकडून निवडणूक लढवताना तब्बल ९३ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. २०१९ मध्ये कपिल पाटील यांना ५ लाख २५ हजारांच्या आसपास तर काँग्रेसचे सुरेश तावरे यांना ३ लाख ६७ हजार तर वंचितचे अरुण सावंत यांना ५१ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. यावेळी कपिल पाटील यांचे मताधिक्य १ लाख ५६ हजार एवढे भक्कम होते. २०२४ मध्ये हॅटट्रीक साधण्याची संधी असलेल्या कपिल पाटील यांना ६६ हजारांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले. बाळ्यामामा म्हणून ओळखे जाणारे राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांना ४ लाख ९९ हजार, कपिल पाटील यांना ४ लाख ३२ हजार तर अपक्ष नीलेश सांबारे यांना २ लाख ३१ हजार मते पडली. सांबारे यांनी घेतलेली मते लक्षणीय असून त्यांनी कपिरल पाटील यांची मते खाल्ली असावी. २०१४, २०१९ मध्ये सलग दोनदा कपिल पाटील यांनी भाजपसाठी विजय खेचून आणला. मात्र, दोन्ही वेळी मोदी लाट आणि पुलवामानंतरची देशप्रेमाची लाट त्यांच्या विजयात महत्त्वाची ठरली

शरद पवारांचे डावपेच 

भिवंडी मतदारसंघातील राजकीय रचना, मतदारांचा कल, सध्याचे वातावरण याचा अंदाज घेऊन शरद पवार यांनी अचूक डावपेच आखले. या मतदारसंघातील केवळ एका आमदाराची साथ मिळते हे वास्तव लक्षात घेऊनही भिवंडीची जागा आपल्या पदरात पाडून घेतली. महाविकास आघाडीच्या चर्चेत या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही होते. शरद पवार सुरेश म्हात्रे यांच्यासाठी तर काँग्रेस सुरेश तावरे यांच्यासाठी आग्रही होते. भिवंडी मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यानंतरही काँग्रेसमध्ये  मोठी नाराजी होती. सुरेश तावरे यांनी तर निवडणूक लढवण्याची घोषणाही केली होती. अखेर शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष आणि तावरे यांची समजूत काढून नाराजी दूर केली. तसेच समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळवून राष्ट्रवादीने मोठी बाजी मारली. महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या कपिल पाटील यांनी अगोदरच प्रचाराला सुरुवात केली होती. भिवंडी मतदारसंघात कल्याण, ठाणे, अंबनारथमधील काही भागाचा समावेश होतो. त्यामुळं येथील समस्याही वेगळ्या प्रकारच्या आहेत. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईशी जोडणारा रेल्वे मार्ग नसल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर यंत्रमाग उद्योग, वाहतुकीच्या समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव, पाण्याचा प्रश्नही या ठिकाणी गंभीर बनला  आहे.

राजकीय बलाबल 

२०१९ ला कपिल पाटील विजयी झाले तेव्हा कुणबीसेना, श्रमजीवी आदिवासी संघटनेचा पाठिंबा w निर्णायक ठरला होता. भिवंडी मतदारसंघात भिवंडी, शहापूर, मुरबाड, बदलापूर, कल्याण (पश्चिम) या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. भिंवडी ग्रामीणमध्ये शिंदे शिवसेनेचे शांताराम मोरे, शहापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दौलत दराडे, भिवंडी पश्चिममध्ये भाजपचे महेश चौगुले, भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख, कल्याण पश्चिममध्ये शिंदे शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, मुरबाडमध्ये भाजपचे किसन कथोरे असे आमदार आहेत. भिवंडी पूर्वचे रईस शेख यांचा अपवाद केला तर बाकीचे सारे आमदार महायुतीच्या बाजूचे होते. त्यामुळे पाचविरुद्ध एक अशा विषम परिस्थितीत बाळ्यामामा यांना हा सामना लढावा लागला. भिवंडीतील मतदार संख्येचा विचार करता येथे मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे समाजवादी पार्टी, एमआयएम यांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. भिवंडी पूर्वचे रईस शेख यांनी म्हात्रे यांना मोठी ताकद दिली. एवढेच नव्हे तर भिवंडी मतदारसंघात इतर ठिकाणी सपाची चांगली ताकद असून त्यांनीही म्हात्रे यांना बळ पुरवले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest