पडद्याआडून : दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ; ठाकरे सेनेचा हक्काचा मतदारसंघ!

अयोध्या आंदोलनाच्या काळापासून दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाने नेहमी शिवसेनेला साथ दिली आहे. आतापर्यंत नऊ वेळा विजय देणारा हा मतदारसंघ शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ मानता येईल.

South-Central Mumbai Lok Sabha Constituency, Lok Sabha Election 2024, Shivsena UBT

संग्रहित छायाचित्र

अयोध्या आंदोलनाच्या काळापासून दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघाने नेहमी शिवसेनेला साथ दिली आहे. आतापर्यंत नऊ वेळा विजय देणारा हा मतदारसंघ शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ मानता येईल. २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतरही विपरीत राजकीय स्थितीतही मतदारांनी बाळासाहेंबाच्या विचाराशी असलेली आपली निष्ठा ढळू दिली नाही हे विशेष. 

कधीकाळी वेगवेगळ्या पक्षांतील दिग्गजांना संधी देणाऱ्या या मतदारसंघातून कामगारांचे लढे लढवणारे दत्ता सामंत विजयी झाले होते. त्याच्यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे दोनवेळा लोकसभेवर गेले होते. १९८९ नंतर मात्र अपवाद वगळता बहुतेकवेळा या मतदारसंघाने शिवसेनेच्या उमेदवारांना संधी दिली आहे. यामुळे शिवसेनेच्या मुंबईतील हक्काच्या मतदारसंघापैकी एक अशी या मतदारसंघाची ओळख सांगता येईल. शिवसेनेत पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर हा मतदारसंघ कोणाच्या बाजूने उभा राहतो याविषयी औत्सुक्य होते. मतदारांनी मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आपला विश्वास कायम असल्याचे दाखवून देत ठाकरे गटाच्या पदरात आपले दान टाकले.       

राजकीय बलाबल 
मतदारसंघात कष्टकरी जनता अधिक प्रमाणात असून चेंबूर, धारावीत त्यांचे प्राबल्य दिसून येते. या मतदारसंघात अणुशक्तीनगर, चेंबूर हे मुंबई उपनगर जिल्ह्यातले दोन तर मुंबई शहरातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा आणि माहीम हे विधानसभेचे मतदारसंघ येतात.येथे मिश्र वस्ती असली तरी बहुतांश मतदार कष्टकरी, अल्प, अत्यल्प उत्पन्न गटातील असून लोकसंख्येची घनता जास्त आहे. अणुशक्ती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक २०१९ मध्ये विजयी झाले असले तरी सध्या ते अजित पवार गटात आहेत चेंबूरमध्ये विजयी झालेले प्रकाश फातर्पेकर पक्षफुटीनंतरही ठाकरे गटात आहेत. धारावीमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, सायनमध्ये भाजपचे कॅ. तमिल सेल्वन तर वडाळ्यात भाजपाचे कालीदास कोळंबकर आमदार आहेत. माहीममध्ये निवडून आलेले सदा सरवणकर शिंदे गटात आहेत. त्यामुळे चेंबुर आणि धारावीचे आमदार सोडले तर बाकीच्या चार आमदारांनी आपली ताकद शिंदे गटाच्या उमेदवारांमागे लावली होती. 

रावळेंचा पाचवेळा विजय 
१९५२ पासून येथूनन निवडून गेलेल्या खासदारांवर नजर टाकली तर या मतदारसंघाने कोणत्याही एका पक्षांच्या बाजूने कल दिलेला दिसत नाही. येथून अनेक दिग्गजांनी निवडणूक लढवली असून अनेक पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याचे दिसते. १९५२ ला काँग्रेसच्या जयश्री रायजी विजयी झाल्या तर १९५७ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे येथून विजयी झाले. १९६२ मध्ये काँग्रेसचे विठ्ठल गांधी तर १९६७ मध्ये पुन्हा एकदा डांगे यांना मतदारांनी निवडून दिले. १९७१ मध्ये काँग्रेसचे अब्दुल कादर सालेभाई विजयी झाले. आणीबाणीनंतरच्या जनता लाटेमध्ये १९७७ ला जनता पार्टीतर्फे बापू कांबळे तर १९८० मध्ये काँग्रेसचे राजाराम रामजी भोळे विजयी झाले होते. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसची लाट असतानाही गिरणी कामगारांचे नेते दत्ता सामंत अपक्ष म्हणून लोकसभेत गेले. १९८९ मध्ये वामनराव महाडिक यांच्या रुपाने हा मतदारसंघ प्रथमच शिवसेनेकडे आला. त्यानंतर एक अपवाद वगळता हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ असे सलग पाचवेळा शिवसेनेच्या मोहन रावळे दिल्लीत पोहोचले होते. २००९ मध्ये काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. यावेळी शिंदे गटातर्फे राहुल शेवाळे यांना पराभवास सामोरे जावे लागले. 

इतिहास लढतींचा 
मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेनेमध्ये थेट लढत झालेल्या मतदारसंघातील एक म्हणजे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघ. येथे ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा ५३ हजारांहून अधिक मतांनी पराभव करत मुंबई कोणाची या प्रश्नाचे एका अर्थाने उत्तर दिले. देसाईंना ३ लाख ९५ हजार तर शेवाळेंना ३ लाख ४१ हजार मते  मिळाली. शिंदे गटाला साथ देणाऱ्या शेवाळेंना हॅटट्रीकची संधी साधता आली नाही. यापूर्वी २०१९ मध्ये शेवाळे यांना ४ लाख २४ हजार तर काँग्रेसचे एकानाथ गायकवाड याना २ लाख ७२ हजार तर वंचितचे संजय भोसले यांना ६३ हजार मते पडली होती. २०१४ मध्ये सेनेचे राहुल शेवाळे यांना ३ लाख ९१ हजार तर काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांना २ लाख ४३ हजार मते  मिळाली होती. यावेळी मनसेचे आदित्य शिरोडकर यांना ७३ हजार मते मिळाली होती. यावेळी मनसेची हवा ओसरत चालली होती. कारण, यापूर्वी २००९ मध्ये मनसेच्या श्वेता परुळेकर यांनी लाखांवर मते घेतली होती. त्यावेळी झालेल्या तिहेरी लढतीत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड  यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांना २ लाख ५७ हजार तर शिवसेनेचे सुरेश गंभीर यांना १ लाख ८१ हजार मते मिळाली होती. २००४ च्या निवडणुकीत शिवेसेनेचे मोहन रावळे विजयी झाले होते. हा त्यांचा पाचवा विजय होता. त्यावेळी त्यांना १ लाख २८ हजार तर राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांना १ लाख ६ हजार मते मिळाली होती. त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे अध्यक्ष आणि गुन्हेगारीमुळे प्रसिद्धीस आलेल्या अरुण गवळी याने निवडणूक लढवताना ९२ हजारांच्या आसपास मते मिळवली होती. 

धारावी हे वैशिष्ट्य
वैविध्यपूर्ण मतदार हेच मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक जाती याचे एक मिश्रण येथे झाल्याचे पाहायला मिळते. मिनी भारत येथे वसल्याचे दिसते. धारावीत दक्षिण, उत्तर भारताच्या विविध भागातील मतदार स्थायिक झालेले आहेत. समाजाच्या विविध आर्थिक स्तरातील लोक येथे पाहायला मिळतात. तसेच अनेक अनेक लहानमोठे उद्योग येथे आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेली धारावी झोपडपट्टी याच मतदारसंघात येते. मुंबईच्या मध्यवर्ती भागात जवळजवळ ६०० एकरवरती ही झोपडपट्टी असून ६० हजारहून अधिक झोपड्यांमध्ये १० लाखांहून अधिक लोक राहतात. शिवाय, १३ हजारांहून अधिक लघु उद्योग धारावीत आहेत. महापालिकेतील नोंदीनुसार येथील जाती-धर्माचे वैविध्य पाहायला मिळते. आदी द्रविड, नाडर, थेवर हे तमिळ, राज्यातील चर्मकार समाज, भटक्या-विमुक्तांमधील कोंचिकोरवे ही माकडवाली जमात, उत्तर प्रदेशमधल्या बरेलवी, देवबंदी या मुस्लिम पोटजाती, बिहार-पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचे मुस्लीम, कर्नाटकातील गुलबर्ग्याचा गोंधळी समाज (भांडीवाले), राजस्थानचे मारवाडी, केरळातून  आलेले हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन, हरियाणातली वाल्मिक अशा विविध जाती-धर्माच्या लोकांनी शतकाहून अधिक काळापूर्वी धारावी जवळ केली आहे. जुन्या सरकारी नोंदींनुसार, कोळी हे धारावीचे मूळ निवासी. कालांतराने विविध समुदायाचे लोक धारावीत आले. त्यातील काहींच्या तिसऱ्या, चौथ्या पिढ्या येथे राहत आहेत. लेदरची मोठी बाजारपेठ धारावीत आहे. मातीच्या वस्तू हाताने बनवणारा कुंभारवाडा धारावीत आहे. टेक्स्टाईल, गारमेंट आणि शिलाईची कामेही मोठ्या प्रमाणात आहे.मुंबईत धारावी मोक्याच्या ठिकाणी आहे त्याचे कारण म्हणजे रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम लाईनला धारावी संलग्न आहे. धारावीच्या पश्चिमेला माहीम रेल्वे स्टेशन, पूर्वेला सायन आणि उत्तरेला मिठी नदी आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest