पडद्याआडून! ‘ पॉवर ऑफ कॉमन मॅन’

सहकार आणि राजकारण याबद्दल राज्यभर प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा. गेल्या काही दशकांत पाहावयास मिळालेला पवार विरुध्द विखे राजकीय वैर यावेळीही पाहावयास मिळाले आणि पुन्हा एकदा पवार यांनी बाजी मारली.

Nilesh Lanke

संग्रहित छायाचित्र

पवार-विखे घराण्याच्या तीन पिढ्यांतील राजकीय वैराचे रणांगण- अहमदनगर

सहकार आणि राजकारण याबद्दल राज्यभर प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्हा. गेल्या काही दशकांत पाहावयास मिळालेला पवार विरुध्द विखे राजकीय वैर यावेळीही पाहावयास मिळाले आणि पुन्हा एकदा पवार यांनी बाजी मारली. त्यांनी राजकीय परिस्थितीचे केलेले अचून निरीक्षण, लढवलेले डावपेच आणि कार्यकर्त्यांची साथ यामुळे पवारांनी पुन्हा नगरमध्ये ताकद दाखवून दिली. निलेश लंके (Nilesh Lanke)  यांच्या रुपाने सामान्यांच्या शक्तिचा विजय झाला आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातील शाहरूख खानच्या‘ डोन्ट अंडरएस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन’ या संवादांची आठवण लकेंच्या विजयाने येते.

या मतदारसंघात शेवगावमध्ये भाजपच्या मोनिका राजळे, श्रीगोंदामध्ये भाजपचे बबनराव पाचपुते, राहुरीत राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे, पारनेरमध्ये नीलेश लंके, नगरमध्ये राष्ट्रवादीचे संग्राम जगताप,  कर्जत-जामखेडमध्ये राष्ट्रवादीचे रोहित पवार हे आमदार आहेत. भाजपचे दोन विरुद्ध राष्ट्रवादीचे चार असे चित्र असले तरी विखेंच्या अफाट यंत्रणेसमोर लढणे साधी गोष्ट नव्हती. तसे बघायला गेले तर पवार कुटुंब आणि विखे यांच्यातील राजकीय वैमनस्याला मोठा इतिहास आहे. प्रवरानगरशी असलेला पवार कुटुंबाचा संबंध पन्नास वर्षांपेक्षा जास्त जुना आहे. शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार हे विठ्ठलराव विखे पाटलांनी स्थापन केलेल्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात काही काळ अधिकारी म्हणून काम करत होते. त्यावेळी शरद पवारही प्रवरानगरच्या महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेत होते. राज्याच्या राजकारणात नेहमीच शरद पवार विरुद्ध विखे असं चित्र राहिले आहे. यशवंतराव चव्हाणांनंतर काँग्रेसमध्ये शरद पवार आणि शंकरराव चव्हाण असे दोन गट तयार झाले. शंकरराव चव्हाण गट हा यशवंतराव विरोधी गट असल्याने बाळासाहेब विखेंचा पाठिंबा कायम शंकरराव चव्हाण गटाला असायचा. बाळासाहेब विखे-पाटील आणि शरद पवारांधील वाद १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत टोकाला गेला. अहमदनगरमध्ये यशवंतराव गडाखांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर बाळासाहेब विखे पाटील गडाखांविरुद्ध अपक्ष लढले. यशवंतराव गडाख अटीतटीच्या लढतीत विजयी झाले. भाषणात उत्तरेतील जित्राबं (जनावरं) दक्षिणेत येतील... पैसे देतील, सायकल देतील (विखे पाटील यांचं निवडणूक चिन्ह सायकल) ते घ्या, पण मतं कॉंग्रेसला द्या, असं वक्तव्य शरद पवारांनी केले. त्यावरून आचारसंहिता भंग झाला, बदनामी झाली असा आरोप विखे यांनी केला होता. हा खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. या निकालात कोर्टाने शरद पवार यांच्यावरही ठपका ठेवला तर गडाखांना सहा वर्षं निवडणूक लढवण्यास बंदी घातली. या खटल्याची सल शरद पवार यांच्या मनात आजही असावी आणि त्यातून त्यांनी नगरमध्ये नेहमी विखेंविरोधात भूमिका घेतल्याचे दिसते. हा संघर्ष पवारांचे पुतणे अजित पवार आणि बाळासाहेब विखेंचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही सुरूच राहिला. अजित पवार अर्थमंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील कृषिमंत्री असताना यांच्यातले वाद कायम समोर येत राहिले. अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यातील मुळा-प्रवरा ही सहकारी वीज कंपनी थकीत रकमेमुळे बरखास्त केली होती. २००९ मध्ये शिर्डी मतदारसंघ राखीव झाल्याने शरद पवार यांच्या आग्रहाने रामदास आठवले यांची शिर्डीत उमेदवारी निश्चित झाली. त्या बदल्यात राष्ट्रवादीकडून नगर दक्षिणची जागा बाळासाहेब विखे पाटील यांच्यासाठी सोडण्याचा निर्णय झाला. ऐनवेळी पवारांनी तेथे राष्ट्रवादीचा उमेदवार दिला. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांची खासदारकी संपुष्टात आली. याला प्रत्युत्तर म्हणून विखे पाटलांनी आठवले यांच्याविरुद्ध प्रचार करत त्यांना पराभूत केले. 

आता हेच वैमनस्य तिसऱ्या पिढीमध्येही कायम ठेवत शरद पवार यांनी नगरमध्ये भाजपचे सुजय विखेंच्या विरोधात नीलेश लंके यांना उभे केले. नेते नावाने ओळखले जाणारे आणि पैलवानकीची आवड असणारे नीलेश शिक्षकाच्या एका सामान्य कुटुंबात जन्माला आले. समाजकारणाचे वेड असणाऱ्या नीलेश यांनी कोरोना काळात उभारलेल्या १ हजार बेडच्या रुग्णालयामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. अहमदनगरला कायनेटिक कंपनीमध्ये दोन ते तीन वर्षे नोकरी केली. समाजकार्याची आवड असल्याने नोकरीत त्यांचे मन रमले नाही. कौटुंबिक परिस्थितीमुळे हंगा गावी एसटी बस स्टँड वर त्यांनी एक छोटे चहाचे हॉटेल सुरू केले. समाजसेवा व परोपकारी स्वभावामुळे त्यांना चहासाठी लागणाऱ्या दुधाचे पैसे मिळणेही मुश्किल झाल्यावर हॉटेल बंद केले. पुढे  किराणा मालाचे दुकानही सुरू केले. पारनेरला सभेत जाताना बाळासाहेब ठाकरे यांचा नीलेश लंके यांना आशीर्वाद मिळाला. तेव्हापासून शिवसेनेत कार्यरत झाले. तालुका प्रमुख झाल्यावर सामाजिक कार्य करताना नीलेश लंके प्रतिष्ठानची स्थापना केली. अखेर शरद पवारांच्या विश्वासाला खरे उतरत त्यांनी निवडणूक लढविली आणि अफाट यंत्रणा असणाऱ्या सुजय विखे यांना पराभूत करून दिल्ली गाठली.  शरद पवार यांचे डावपेच, सुजय विखे यांच्याविषयीची नाराजी, धार्मिक ध्रुवीकरणातून एकवटलेल्या मुस्लीम मतांचे एकगठ्ठा मतदान लंके यांच्या विजयाचे मुख्य सूत्र ठरले. भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी अजमल कसाब बाबतच्या वडेट्टीवार  यांच्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेसवर आरोप केल्याने धार्मिक ध्रुवीकरणात नव्याने भर पडली. त्यातच भाजपच्या ४०० पारच्या नाऱ्यामुळे दलित समाज घटनेमध्ये बदल केला जाईल का, या शंकेने ग्रासला होता. तो मतदारही लंके यांच्यामागे उभारल्याने लंके यांच्या विजयास हातभार लागला. मतदारसंघाच्या एका टोकाला असलेले लंके आणि मतदारसंघाबाहेरील सुजय विखे ही लढत सामान्य कार्यकर्ता विरुद्ध अफाट यंत्रणा, धनशक्ती अशी होती. त्यातच सुजय विखे यांनी लंके यांच्या इंग्लिश बोलण्यावरून केलेली हेटाळणी सुजय यांना महागात पडली.    

अशी झाली वैराला सुरूवात 
१९८४, १९८९ आणि १९९१ मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे यशवंतराव गडाख यांनी निवडणूक लढवली. या काळातच शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय वैमनस्याला सुरुवात झाली आणि त्याने १९९१ मध्ये टोक गाठले. १९९८ मध्ये शिवसेनेकडून बाळासाहेब विखे, १९९९, २००९, २०१४ भाजपकडून दिलीपकुमार गांधी, २०१९ मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून विजयी झालेले सुजय विखे यांचा अपवाद केला तर बहुतेक वेळा या मतदारसंघातून काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला दिसतो. २०१९ मध्येही जागावाटपात नगरची जागा आपल्याला मिळत नसल्याचे पाहून शेवटच्या क्षणी त्यांनी भाजपप्रवेश केला. त्यावेळी सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना पराभूत केले होते. २०१४ मध्ये दिलीपकुमार गांधी यांनी भाजपसाठी विजय मिळवला होता तेव्हा त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजीव राजळे होते. २००९ मध्ये गांधींच्या विरोधात राष्ट्रवादीने शिवाजी कर्डिले यांना उभे केले होते. २००४ मध्ये राष्ट्रवादीने तुकाराम गडाख यांना उमेदवारी दिली तेव्हा पराभूव झालेले उमेदवार होते भाजपचे एन.एस.फरांदे. थोडक्यात सांगायचे झाले तर या मतदारसंघातून शरद पवार यांनी आग्रहाने आपला उमेदवार उभा केला आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड  मतदारसंघात पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीचे रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवली तेव्हाही हे राजकीय वैमनस्य दिसून आले होते. त्यावेळी रोहित पवारांनी सुजय विखे यांची भेट घेतली तेव्हा पवार-विखे घराण्यातील संघर्ष आता मिटणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावेळी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्यामागे विखे यांनी आपली यंत्रणा ताकदीने उभी केली होती. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story