पडद्याआडून: मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ - ठाकरे सेनेची सद्दी!

राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी असल्याने दक्षिण मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मुंबई आणि काँग्रेसवर जबर दबदबा असणारे स. का. पाटील असो की मुरली देवरा असो, त्यांनी देशाच्या राजकारणावर आपली अशी छाप पाडली आहे.  स. का. पाटील यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या जायंट किलर जॉर्ज  फर्नांडिस यांनाही याच मतदारसंघाने साथ दिली.  आता सेनेची सद्दी सुरू आहे. 

Mumbai South Lok Sabha Constituency

संग्रहित छायाचित्र

राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी असल्याने दक्षिण मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मुंबई आणि काँग्रेसवर जबर दबदबा असणारे स. का. पाटील असो की मुरली देवरा असो, त्यांनी देशाच्या राजकारणावर आपली अशी छाप पाडली आहे.  स. का. पाटील यांना पराभवाची धूळ चारणाऱ्या जायंट किलर जॉर्ज  फर्नांडिस यांनाही याच मतदारसंघाने साथ दिली.  आता सेनेची सद्दी सुरू आहे. 

प्रदीर्घ काळ काँग्रेसचे वर्चस्व असणाऱ्या या मतदारसंघावर अलीकडे शिवसेनेने पकड बसवली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही खरी सेना कोणाची, या प्रश्नाचे उत्तर या मतदारसंघाने दिले असून ठाकरे आणि शिंदे गटातील थेट लढतीत ठाकरे सेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. भारतीय जनता पक्षाशी युती असताना आणि युती नसतानाही विजय मिळवताना ठाकरे सेनेला मिळालेल्या  मतांवर नजर टाकली तर मुंबई कोणाची या प्रश्नाचे उत्तर मिळते.  स. का. पाटील यांचे तीन आणि मुरली देवरा घराण्यातील सहा विजय या मतदारसंघाने पाहिले आहेत. आता ठाकरे सेनेचे सावंत सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. 
            
’मुंबई मेरी जान‘ 
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईच्या सहा मतदारसंघापेक्षाच नव्हे तर राज्याचा विचार केला तर याचे वेगळेपण नजरेत भरते. खऱ्या अर्थाने हा मतदारसंघ म्हणजे देशाची आर्थिक राजधानी म्हणता येईल. सर्व प्रशासक, शासक, राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी, धनाढ्यांची वसतिस्थानं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँकांची मुख्यालयं, महत्त्वाच्या शाखा, ऐतिहासिक इमारती या भागात आहेत. या कंपन्या करही येथूनच भरतात. येथे मुंबईचे आद्य निवासी कोळ्यांची घरे आहेत तसेच नौदलाचे केंद्र, बंदरही आहे. दिवसा या मतदारसंघाची लोकसंख्या काही लाखांनी वाढते आणि रात्री तेवढीच कमीही होते. येथील विकासकामे, नवे रस्ते, पूल, पावसाळ्यातील प्रश्न, बीडीडी वसाहतींचा प्रश्न, कोळीवाडे अशा महत्त्वाच्या विषयांवर प्रतिनिधींकडून कार्याची अपेक्षा असते. देशातील रोजगाराचं केंद्र येथे आहे. इथल्या उच्चभ्रूंमुळे तयार झालेल्या संस्कृतीमुळे या भागाला एक वेगळे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. देशाचे आर्थिक हृदय म्हणजे हा मतदारसंघ. यामुळे तर मुंबईला ’मुंबई मेरी जान‘ असे म्हटले जात असावे. भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ चिंचोळा असून मुंबईच्या दक्षिणेस समुद्रात घुसलेला निमुळता भाग येथे येतो. इतिहासाचा विचार केला तर मुंबईच्या मूळ बेटांपैंकी कुलाबा, लिटल कुलाबा, बॉम्बे, माझगाव, वरळी बेटांवर हा मतदारसंघ आहे. परळमधला शिवडी हा भाग या मतदारसंघात येतो. गेली तीनशे ते साडेतीनशे वर्ष इथं व्यापारी स्थिरावले. ब्रिटिश, युरोपियन, पारशी, गुजराती, पाठारे प्रभू, ज्यू लोकांनी येथे व्यापार थाटला. येथूनच कापसाचा व्यापार वाढला, निर्यात झाली. मुंबई बंदरामुळे देशातील सगळा माल इथूनच परदेशात पाठवला जातो. रिझर्व्ह बँक, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारखी मोठी रेल्वे स्टेशन्सही येथेच आहेत. सत्तेचे केंद्र असणारे विधिमंडळ, मंत्रालय, महानगरपालिका येथे आहे. 

राजकीय बलाबल 
मतदारसंघात मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वरळी, कुलाबा हे विधानसभा मतदारसंघ आहेत. मलबार हिलमधून भाजपाचे मंगलप्रभात लोढा , कुलाबामधून भाजपाचेच राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. भायखळ्यातून विजयी झालेल्या यामिनी जाधव सध्या शिंदेसेनेत आहेत. मुंबादेवीतून काँग्रेसचे अमिन पटेल, शिवडीतून ठाकरे सेनेचे अजय चौधरी तर वरळीतून ठाकरे सेनेचे आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. ठाकरे सेनेच दोन, भाजपचे दोन, शिंदे सेनेचा आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे.
 
राजकीय इतिहास 
१९५२ मध्ये काँग्रेसचे सदाशिव कानोजी पाटील म्हणजेच स. का. पाटील विजीय झाले. त्यानंतर १९५७ आणि १९६२ मध्येही ते विजयी झाले. मुंबई काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दबदबा असणारे स. का. पाटील एक प्रस्थ होते. सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले स. का. पाटील यांची एकेकाळी मुंबई अनभिषक्त सम्राट अशीही ओळख होती. त्यांना पराभूत करण्याची कामगिरी १९६७ मध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे जॉर्ज फर्नांडिस यांनी केली. त्यानंतर १९७१ मध्ये कैलाश नारायण शिवनारायण हे काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले. १९७७ ला आणीबाणीनंतर जनता पार्टीच्या लाटेमध्ये जनता पक्षाचे रतनसिंह राजदा विजयी झाले. १९८० मध्ये तेच विजयी झाले. मात्र, त्यावेळी त्यांच्या विरोधात पहिल्यांदा काँग्रेसचे मुरली देवरा यांनी निवडणूक लढवली. या  मतदारसंघावर प्रदीर्घ काळ बळकट पकड असणाऱ्या देवरा घराण्यातील पिता-पुत्राने सहा वेळा येथून विजय मिळवला आहे. त्यातील मुरली देवरा यांनी सलग तीन वेळा आणि त्यांचा मुलगा मिलिंद याने दोन वेळा विजय मिळवला आहे. १९८४, १९८९, १९९१ आणि १९९८ अशा चार वेळा मुरली देवरा विजयी झाले. १९९६ आणि १९९९ अशा दोन वेळा भारतीय जनता पक्षाच्या जयवंतीबेन मेहता खासदार झाल्या. त्यानंतर २००४ आणि २००९ अशा दोन वेळा मिलिंद देवरा दोनदा दिल्लीत पोहोचले. २००९ नंतर मात्र देवरा घराण्याची जादू ओसरल्याचे दिसते. उद्योजक वर्गाशी काँग्रेसतर्फे संवाद साधण्याची मोठी भूमिका मुरली देवरा यांनी प्रदीर्घ काळ बजावली. २००९ नंतरच्या काळात मात्र या मतदारसंघावर शिवसेनेने आपले वर्चस्व राखले आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा तीन निवडणुकीत ठाकरे सेनेचे अरविंद सावंत विजयी झाले. २०२४ मध्येही या मतदारसंघाने ठाकरे सेनेला साथ दिली. ठाकरे सेनेचे अरविंद सावंत यांना ३ लाख ९५ हजार, तर शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांना ३ लाख ४२ हजार मते पडली. सावंत ५२ हजारांच्या फरकाने विजयी झाले. या मतदारसंघातून शिंदे सेनेचे मिलिंद देवरा, तसेच भाजपचे राहुल नार्वेकर निवडणूक लढविण्याची चर्चा होती. यापूर्वी २०१९ मध्ये अरविंद सावंत यांना ४ लाख २१ हजार तर काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना ३ लाख २१ हजार मते पडली होती. लाखाच्या फरकाने सावंत विजयी झाले होते. यावेळी वंचितच्या अनिल चौधरींनी ३० हजारांच्या आसपास मते मिळवली होती. २०१४ मध्ये सावंत यांनी देवरा घराण्याची सद्दी संपवली तेव्हा त्यांना ३ लाख ७६ हजार मते पडली होती. मिलिंद देवरा यांना २ लाख ४६ हजार मते  मिळाली होती. सावंत १ लाख २८ हजारांच्या फरकाने विजयी झाले होते. यावेळी मनसेचे बाळा नांदगावकर यांना ८४ हजार तर आपच्या मीरा सन्याल यांना ४० हजार मते पडली होती. २००९ मध्ये मिलिंद देवरा विजयी झाले होते तेव्हा मनसेची चांगली हवा होती. देवरा यांना २ लाख ७२ हजार, मनसेचे नांदगावकर यांना १ लाख ५९ हजार तर ठाकरे सेनेचे मोहन रावळे यांना १ लाख ४६ हजार मते  पडली होती. २००४ मध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना १ लाख ३७ हजार तर भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांना १ लाख २७ हजार मते  पडली होती. देवरा १० हजारांच्या फरकाने विजयी झाले होते.       

दिग्गजांची मांदियाळी 
मुंबई शहर, महानगरपालिका, मुंबई प्रदेश काँग्रेस समिती, मुंबईतील उद्योजक यांच्यावर स. का. पाटील यांचा अफाट दबदबा होता. १९३५ मध्ये स. का. पाटील महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९५२  पर्यंत ते पालिकेत कायम राहिले. त्या काळी त्यांचे महापालिकेवर एकहाती वर्चस्व होतं. १९४९ ते १९५२ या काळात तीन वेळा स. का. पाटील महापालिकेचे महापौर होते. या काळात त्यांनी मुंबईसाठी बरीच कामं केली. झाडे लावणं आणि उद्याने बांधणं हे तर त्यांच्या अजेंड्यावरच असे. मुंबई सुंदर दिसावी असे त्यांना मनापासून वाटत असे. आज मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील 'क्वीन्स नेकलेस' म्हणजे मरिन ड्राईव्ह  दिसतो, तो त्यांनीच आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात बांधला. सलग तीन वेळा जिंकून येणाऱ्या स. का. पाटलांच्या सत्तेला सुरुंग लावला तो कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी. जॉर्ज फर्नांडिस यांना कामगारबहुल मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची सूचना त्यांच्या नेत्यांनी केली होती. मात्र जॉर्ज यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाची निवड केली. त्यांनी मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास केला. येथील लोक, मतदार, समस्या, त्यांची आर्थिक परिस्थिती याचा विचार केला आणि जोरदार प्रचार केला. 'तुम्ही स. का. पाटील यांना हरवू शकता, अशी पोस्टर्स सर्व मतदारसंघात लावली आणि त्याचा मोठा प्रभाव मतदारांवर पडला. या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांना १ लाख ४७  हजार तर स. का. पाटलांना १ लाख १८ हजार मते पडली. स. का. पाटील पराभूत झाले आणि त्यांची राजकीय घसरण सुरू झाली. भाजपच्या प्रमुख महिला नेत्या असलेल्या जयवंतीबेन मेहता १९६२ पासून राजकीय क्षेत्रात कार्यरत होत्या. महापालिकेत नगरसेविका त्यानंतर ऑपेरा हाऊस मतदारसंघातून दोन वेळा आमदारही त्या होत्या. त्यानंतर ईशान्य मुंबईतून त्या खासदार झाल्या. दक्षिण मुंबईतून दोन वेळा प्रतिनिधित्व करायला मिळालं. त्या वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होत्या.
काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक तसेच गांधी घराण्याचे निकटवर्तीय तसेच उद्योगस्नेही नेते अशी ओळख मुरली देवरा यांची होती. १९६८ मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक झाले. १९७७ साली महापौरही झाले. संपुआच्या दोन्ही सरकारांमध्ये २९ नोव्हेंबर २००६ ते १८ नोव्हेंबर २०११ मद्ये  मुरली देवरा पेट्रोलियममंत्री होते. दोन दशकांहून अधिक काळ ते मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९८० मध्ये  त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचे 'निवडणूक प्रतिनिधी' म्हणून धीरुभाई अंबानी यांनी काम केले होते. देवरांचे अनेक उद्योगपतींशी चांगले संबंध होते. तसेच मुकेश आणि अनिल अंबानी यांच्याशीही घरोब्याचे संबंध होते. मुरली देवरा यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र मिलिंद यांच्याकडेही आला. ते मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाले. काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली. तसेच केंद्रात मंत्रीही होण्याची संधी मिळाली. २०१४ च्या मोदी लाटेमध्ये अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. २०२४ मध्ये त्यांनी काँग्रेसशी आपल्या कुटुंबाचे असणारे ५५ वर्षांचे संबंध तोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे अरविंद सावंत अनेकदा लोकसभेतील भाषणांमुळे चर्चेत असतात. त्यांची मूळ ओळख कामगार नेते अशीच आहे. महानगर टेलिफोन कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षं जबाबदारी पार पाडली आहे. २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा युती असताना केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद मिळाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा यांचे मार्ग वेगळे झाले. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली आणि सावंत यांनी राजीनामा दिला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest