पडद्याआडून: मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ - आलटून-पालटून!

तत्कालीन जनता पार्टीचे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अपवाद केला तर या मतदारसंघाने कोणत्याही एका उमेदवाराला सलग दोन वेळा निवडून दिलेले नाही. काँग्रेसचे गुरुदास कामत चार वेळा येथून खासदार झाले, मात्र ते वेगवेगळ्या काळात. एकापेक्षा अधिक वेळा कामत, सोमय्या, संजय पाटीलही निवडून आले.

Political News, Subrahmanyam Swamy, Gurudas Kamat, Mumbai North East,  Lok Sabha Constituency, mumbai electoins,

संग्रहित छायाचित्र

तत्कालीन जनता पार्टीचे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अपवाद केला तर या मतदारसंघाने कोणत्याही एका उमेदवाराला सलग दोन वेळा निवडून दिलेले नाही. काँग्रेसचे गुरुदास कामत चार वेळा येथून खासदार झाले, मात्र ते वेगवेगळ्या काळात. एकापेक्षा अधिक वेळा कामत, सोमय्या, संजय पाटीलही निवडून आले. कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतादरसंघाने आणीबाणीनंतर म्हणजे १९८० नंतर साधारणपणे काँग्रेस आणि भाजपला आलटून पालटून संधी दिल्याचे दिसते.  

मुंबई ईशान्य या मतदारसंघाने १९६७ पासून आपले वेगळेपण दाखवून दिले आहे. एकीकडे पूर्व उपनगरांमधील मध्यमवर्गीय, निम्नमध्यमवर्गीय जनता तर शिवाजीनगर म्हणजे मानखुर्दमध्ये अतिशय गरीब मतदार असे चित्र दिसते. ढोबळमानाने या मतदारसंघावर शिवसेना-भाजपा युतीचे प्राबल्य आहे. अपवाद फक्त मानखुर्द शिवाजीनगरचा. २०१४ आणि २०१९ ला भाजपला येथून संधी मिळाली असली तरी भाजपचे प्राबल्य असलेला मतदारसंघ असे काही म्हणता येणार नाही. २०२४ मध्ये मुलुंड आणि घाटकोपर पूर्व हे दोन मतदारसंघ वगळता बाकीच्या सर्व मतदारसंघात ठाकरे सेनेने आघाडी घेतली आहे. एवढेच नव्हे तर राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिममध्येही भाजपाला आघाडी मिळाली नाही. यामुळे विधानसभेला उमेदवारी देताना राम कदम यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार असल्याचे दिसते.   

मतदारसंघाची रचना 
मुंबई ईशान्य  मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून तेथे भारतीय जनता पक्षाचे तीन तर ठाकरे शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी असे आमदार आहेत. यावेळी ठाकरे सेनेला अबू आझमींची साथ मिळाल्याने दोन्ही उमेदवारांची ताकद कागदावर तरी समान असल्याचे दिसत होते. त्यातच संजय दिना पाटील यांनी अनेक वेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली असून त्यांचा एक असा मतदारसंघ आणि कार्यकर्त्यांचा संच आहे. त्यातच त्यांना ठाकरे सेनेची आणि अबू आझमी यांच्या मिळालेल्या मदतीच्या जोरावर दिल्ली गाठता आली. मुलुंडमध्ये उमेदवार असलेले भाजपचे मिहीर कोटेचा आमदार आहेत. घाटकोपर पश्चिममध्ये भाजपचे राम कदम आणि घाटकोपर पूर्वमध्ये भाजपचेच पराग अळवणी हे आमदार आहेत. विक्रोळीत संजय राऊत, भांडूपमध्ये रमेश कोरगावकर हे ठाकरे सेनेचे तर, मानखुर्दमध्ये समाजवादी पक्षाचे अबू आझमी आमदार आहेत. 

मतदारसंघाचा इतिहास 
२०२४ च्या निवडणुकीत संजय पाटलांना ४ लाख ५० हजार तर भाजपचे नवखे उमेदवार आमदार मिहीर कोटेचा यांना ४ लाख २१ हजार मते पडली. वंचितचे दुआलत खान यांना १४ हजारांची मते पडली. संजय पाटील २९ हजारांच्या फरकाने निवडून आले. २०१९ ला भाजपचे मनोज कोटक २ लाख २६ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते तेव्हा त्यांना ५ लाख १४ हजार तर राष्ट्रवादीकडून उभे असलेले संजय पाटील यांना २ लाख ८८ हजार मते पडली होती. वंचितच्या निहारिक खोडियाल यांना ६८ हजार मते पडली होती. २०१४ मध्ये भाजपचे किरीट सोमय्या यांना ५ लाख २५ हजार मते तर राष्ट्रवादीचेच संजय पाटील यांना २ लाख ८ हजार मते पडली होती. त्यावेळी आपच्या मेधा पाटक यांना ७६ हजारांच्या आसपास मते पडली होती. सोमय्या ३ लाख १७ हजारांच्या फरकाने निवडून आले होते. २००९ ला संजय पाटील राष्ट्रवादीकडून निवडून आले आणि प्रथम खासदार बनले. त्यावेळी त्यांना २ लाख १३ हजार तर भाजपचे किरीट सोमय्या यांना २ लाख १० हजार मते पडली. संजय पाटील २ हजार ९९३ च्या निसटत्या फरकाने विजयी झाले होते. त्यावेळी हवा असलेल्या मनसेचे शिशीर शिंदे यांनी तब्बल १ लाख ९५ हजार मते घेतली होती. २००४ ला काँग्रेसचे गुरुदास कामत चौथ्यांदा येथून निवडून गेले तेव्हा त्यांना ४ लाख ९३ हजार तर भाजपचे किरीट सोमय्या यांना ३ लाख ९४ हजार मते पडली होती. कामत त्यावेळी ९९ हजारांच्या फरकाने विजयी झाले होते. 

चारवेळा कामत विजयी 
या मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर साधारणपणे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला आलटून पालटून मतदारांनी संधी दिल्याचे दिसते. आलटून पालटून संधी देण्याचे सत्र हे साधारण आणीबाणीनंतर अस्तित्वात आल्याचे दिसते. १९६७ ला काँग्रेसचे एस. जी. बर्वे आणि पोटनिवडणुकीत त्यांच्या भगिनी तारा गोविंद सप्रे निवडून आल्या होत्या. १९७१ ला काँग्रेसचे राजाराम गोविंद कुलकर्णी दिल्लीत पोहोचले होते. आणीबाणीनंतरच्या १९७७ आणि १९८० च्या निवडणुकीत तत्कालीन जनता पार्टीचे डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी निवडून आले होते. नंतरच्या काळात स्वामी भारतीय जनता पक्षात दाखल झाले. १९८४ ला काँग्रेसचे गुरुदास कामत तर ८९ ला भाजपच्या जयवंतीबेन मेहता निवडून आल्या होत्या. ८९ ला अयोध्येमुळे हिंदुत्वाचा  मुद्दा जोराने पुढे आल्याचा फायदा होऊन भाजपने प्रथम बाजी मारली. या नंतरच्या काळात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती असल्याने या मतदारसंघात भाजप निवडणूक लढवत होता. १९९१ ला  काँग्रेसचे गुरुदास कामत तर त्यानंतर १९९६ ला भाजपचे प्रमोद महाजन निवडून दिल्लीत पोहोचले. महाजन यांना त्यांच्या कारकिर्दीत लोकसभेत निवडून जाण्याची एकदाच संधी मिळाली, ती याच मतदारसंघातून. १९९८ ला पुन्हा काँग्रेसचे गुरुदास कामत तर १९९९ ला भाजपचे किरीट सोमय्या निवडून आले होते. २००४ ला पुन्हा काँग्रेसचे गुरुदास कामत दिल्लीत पोहोचले. अशा तऱ्हेने १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ अशा चार वेळा या मतदारसंघातून गुरुदास कामत यांनी दिल्लीत पोहोचण्याची कामगिरी केली आहे. २००९ ला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील हे निवडून आले. २०१४ ला भाजपचे किरीट सोमय्या आणि २०१९ ला भाजपचेच मनोज कोटक निवडून आले.       

स्वामींचा विक्रम 
इथल्या विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा युतीचं प्राबल्य दिसत असलं तसेच सलग दोन लोकसभा निवडणुकांत मतदारांनी भाजपाच्या पारड्यात वजन टाकलं असलं तरी आजवर अनेक पक्षांना इथून लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आहे. सलग दोन वेळा निवडून येण्याची कामगिरी करणारे स्वामी हे एकटेच. स्वामी यांच्यासारखे या मतदारसंघातूनन एकापेक्षा अधिक वेळा कामत आणि सोमय्या, संजय पाटीलही निवडून आले आहेत. मात्र, त्यांना सलग कामगिरी कधी करता आलेली नाही.  २०२४ ला मात्र राष्ट्रवादी सोडून ठाकरे सेनेतून निवडणूक लढवणारे संजय दिना पाटील दुसऱ्यांदा खासदार बनले. २०१४ आणि २०१९ ला संजय पाटील पराभूत झाले असले तरी त्यांनी निवडणूक लढवली होती. चार वेळा निवडणूक लढवताना दोन विजय आणि दोन पराभव अशी त्यांची कामगिरी राहिली आहे.

सोमय्या आणि ठाकरे 
मुंबई महापालिकेवर शिवसेनेचे किंवा मराठी मतदारसंघाचे असलेले वर्चस्व भारतीय जनता पक्षाच्या नजरेत खुपसत असल्याचे सातत्याने दिसून येत होते. त्यामुळे युती असतानाही महापालिकेच्या प्रश्नावरून शिवसेनेचे कोंडी करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सतत केले जात होते. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या सतत पालिकेतील कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रकाशात आणून शिवसेनेला अडचणीत आणण्याचे काम करत होते. यामुळे शिवसेना आणि भाजपच्या संबंधांमध्ये कटुता आली होती. २०१९ मध्ये भाजप तत्कालीन खासदार किरीट सोमय्या यांना पुन्हा संधी देईल अशी स्थिती होती. मात्र सोमय्या यांनी अनेक वर्षे मुंबई महापालिकेतील व्यवहारांवर बोट ठेवल्याने, तसेच सेनेसंदर्भातील अनेक प्रकरणांवर जाहीर वक्तव्ये केल्याने त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेने ठाम विरोध केला होता. शिवसेना कार्यकर्त्यांनी तर सोमय्या उमेदवार असतील तर प्रचार करणारच नाही अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपमधील संबंधातही कटुता आली होती. शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे भाजपाने सोमय्या यांच्याऐवजी मनोज कोटक यांना संधी दिली होते. तेव्हापासून खासदारकीपासून वंचित असलेले सोमय्या आजही बाजूला पडलेले दिसतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest