पडद्याआडून: धुळे लोकसभा मतदारसंघ - पुन्हा कब्जा!

अलीकडच्या काळात भाजपने धुळ्यावर कब्जा मिळवला असला तरी हा काँग्रेसचा परंपरागत गड मानता येईल. मतदारसंघ तयार झाल्यापासून काँग्रेसने ११ वेळा विजय  मिळवला आहे. आदिवासी, बहुजन, मुस्लीम मतदारांनी साथ दिल्याने हा गड पुन्हा मिळवण्यात काँग्रेसला यश आले आहे.   

Political News, bjp, dhule constituency, congress, elections, muslim voters, bahujan

संग्रहित छायाचित्र

अलीकडच्या काळात भाजपने धुळ्यावर कब्जा मिळवला असला तरी हा काँग्रेसचा परंपरागत गड मानता येईल. मतदारसंघ तयार झाल्यापासून काँग्रेसने ११ वेळा विजय  मिळवला आहे. आदिवासी, बहुजन, मुस्लीम मतदारांनी साथ दिल्याने हा गड पुन्हा मिळवण्यात काँग्रेसला यश आले आहे.   

भारतीय जनता पक्षाने गेल्या तीन निवडणुकीत मतदारांना स्वतःच्या बाजूनं वळवण्यात यश मिळालेला मतदारसंघ म्हणजे धुळे. २०१४ मध्ये आलेली मोदी लाट आणि २०१९ मध्ये पुलवामाच्या पार्श्वभूमीवरचे देशप्रेमाचे वातावरण यामुळे भाजपला विजय मिळवणे सहजशक्य झाले.   भाजपनं मतदारसंघात सलग दोन वेळा खासदार बनलेले डॉ. सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे खासदारकीची हॅटट्रिक करण्याची संधी त्यांच्यासमोर असल्याने त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली. मात्र, या संधीला काँग्रेसने सुरुंग लावला. 

राजकीय स्थिती 
मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर आणि सिंदखेडा हे धुळ्यातील तर मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या नाशिकमधील मतदारसंघांचा समावेश आहे. धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे कुणाल पाटील, धुळे शहरमध्ये एआयएमआयएमचे शाह फारूक अन्वर, सिंदेखेडामध्ये भाजपचे जयकुमार रावळ, मालेगावमध्ये मध्ये एआयएमआयएमचे इस्माईल खलिक, मालेगाव बाह्यमध्ये शिंदे सेनेचे दादा भुसे आणि बागलाणमध्ये भाजपचे दिलीप बोरसे आमदार आहेत. यातील दोन ठिकाणी एआयएमआयएम, दोन ठिकाणी भाजप आणि प्रत्येकी एका ठिकाणी शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. शिवसेनेचे दादा भुसे फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. तसे पाहायला गेले तर सध्या या मतदारसंघात कागदावर तर काँग्रेसची ताकद जाणवत नव्हती. एआयएमआयएमने उमेदवार दिला नसल्याने आणि काँग्रेसच्या परंपरागत मतदारांनी पुन्हा साथ दिल्याने काँग्रेसला आपला गड पुन्हा ताब्यात घेता आला.  

काँग्रेस ११ तर भाजप ६ वेळा विजयी 
धुळे मतदारसंघ तयार झाला त्यावेळी म्हणजे १९५७ मध्ये सुरुवातीलाच भाजप किंवा तत्कालीन जनसंघाचे उत्तमराव पाटील यांना दिल्लीला पाठवले होते. त्यानंतरच्या काळात काँग्रेसने येथे वर्चस्व मिळवले. हे वर्चस्व तीन दशकांपर्यंत कायम होते. या काळात चुडामण पाटील यांनी १९६२, ६७, ७१ आशा तीन वेळा, १९७७ मध्ये विजयकुमार पाटील, १९८०, ८४, ८९ अशा तीन वेळा रेश्मा भोये खासदार बनल्या. त्यानंतर भाजप, काँग्रेसला आलटून-पालटून संधी मिळाली.  २००९ नंतर मात्र परिस्थिती बदलली आणि भाजपने आपला ताबा ठेवला. २००९ मध्ये भाजपकडून प्रताप सोनवणे यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी अंबरीशभाई पटेलांना पराभूत करत विजय मिळवला. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये सुभाष भामरेंनी सलग दोनदा विजय मिळवला. २०२४ मध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला. मतदारसंघ स्थापन झाल्यापासून काँग्रेसने ११ वेळा तर जनसंघाच्या एका विजयासह भाजपने सहा वेळा येथे विजय मिळवला आहे. अलीकडच्या काळातील भाजपच्या वाढत्या ताकदीचा अपवाद केला तर काँग्रेसचा हा परंपरागत गढ असल्याचे म्हणता येईल. 

भाजपच्या वर्चस्वाला हादरा 
२००९ मध्ये भाजपचे प्रताप सोनवणे यांनी विजय मिळवला तेव्हा त्यांना २ लाख ६३ हजार मते  मिळाली होती. त्यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे अमरिशभाई पटेल यांना २ लाख ४३ हजार मते मिळाली होती. यावेळी जनता दल धर्मनिरपेक्षचे माजी मंत्री निहाल अहमद यांना ७२ हजार तर लोकसंग्रामचे अनिल गोटे यांना ५३ हजारांच्या आसपास मते  मिळाली होती. मतविभाजनाचा फटक बसल्याने काँग्रेसला ही जागा १९ हजाराने गमवावी लागली होती. २०१४ मध्ये भाजपचे सुभाष भामरे यांनी ५ लाख २९ हजार मते मिळवत १ लाख ३० हजारांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा अमरिशभाई पटेल यांनाच उमेदवारी दिली होती. त्यांना ३ लाख ९८ हजार मते मिळाली होती. २०१९ मध्ये भामरेंनी ६ लाख १३ हजार मते घेत २ लाख २९ हजारांच्या फरकाने विजय मिळवला होता. यावेळी काँग्रेसने अमरिशभाई यांच्याऐवजी कुणाल रोहिदास पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांना ३ लाख ८४ हजार मते  मिळाली होती. २०१९ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावामुळं विरोधकांच्या मतांचे विभाजन झाले. अपेक्षेप्रमाणे वंचितच्या उमेदवाराला फार मते मिळाली नाही. वंचितचे नबी अमादुल्ला यांना ४० हजारांच्या आसपास मते मिळूनही काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. २०२४ ला काँग्रेसने नाशिकच्या माजी आमदार शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली. तसे पाहायला गेले तर त्या बाहेरच्या असूननही त्यांनी पक्षासाठी विजय खेचून आणला. त्यांना ५ लाख ८३ हजार तर भाजपचे भामरे यांना ५ लाख ८० हजार मते मिळाली. काँग्रेस निसटत्या ३ हजारांच्या फरकाने विजयी झाली.

मंत्रीपुत्राची चर्चा 
जागावाटपात काँग्रेसला हा मतदारसंघ सुटल्याने नाशिकच्या माजी आमदार शोभा बच्छाव यांना येथे उमेदवारी दिली. मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या आणि एमआयएमची शक्ती काँग्रेसच्या कामाला आली. या मतदारसंघात नाशिक, धुळे दोन जिल्ह्यांतील भाग येतो. तसेच बहुजन, आदिवासी, मुस्लीम अशा संमिश्र मतदारांचा येथे प्रभाव आहे. येथे भाजपचा विद्यमान खासदार असला तरी शिंदे सेनेने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार भुसेच्या नावाची चर्चा होती. त्यांनी येथे जनसंपर्क वाढवल्याचे दिसत होते. एवढेच नव्हे तर आविष्कार यांचे निवडणुकीआधी नाशिकमध्ये भावी खासदार असे पोस्टर लागलेले होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकची जागा भाजपला सोडावी लागली तर ही जागा पदरात पाडून घेता येईल असा एका आडाखा होता. भाजपने सुरुवातीलाच सुभाष भामरे यांचं नाव जाहीर केल्यामुळं शिंदे गटाचा भ्रमनिरास झाला.

महायुतीमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावरून काही प्रमाणात नाराजी होती. शिंदे गटाचा डोळा असल्याने त्यांची नाराजी मतदानात दिसेल अशी चर्चा होती. त्यातच तिसऱ्यांदा भामरेंना संधी मिळाल्याने काही प्रमाणात नाराजी होती. भाजपमधील अन्य  नेतेही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. भामरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यावरही मोठे मेळावे किंवा सभा झाल्या नसल्याने पक्षात धूसफूस असल्याची चर्चा होती. काँग्रेसमध्येही अश्विनी पाटील, प्रतिभा शिंदे, डॉ. तुषार शेवाळे आणि श्याम सनेर यांची नावे चर्चेत होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest