संग्रहित छायाचित्र
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. विविध पक्ष निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर करत आहेत. नुकतीच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली, तर काँग्रेसनेही उमेदवारांची तिसरी यादी जाहिर केली. या यादीत अंधेरीतून सचिन सांवत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, याच उमेदवारीवरून ते नाराज झाले आहेत. त्यांना वांद्रे येथून निवडणूक लढवायची होती. मात्र, ही जागा उद्धव ठाकरे गटाला गेल्यामुळे ते नाराज झाले आहे. त्यांनी ट्विट करत अंधेरीतून लढण्यास नकार देत मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली आहे.
जागावाटपावरून महाविकास आघाडीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरून दोन्ही पक्षात धुसफूस सुरू आहे. असे असतानाही दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते असलेले व प्रसारमाध्यांवर पक्षाची बाजू मांडणारे सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ते येथून लढण्यास इच्छुक नसून त्यांनी नाराजी व्यक्त करत मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, हा निर्णय मी वरिष्ठ नेत्यांवर सोपवला आहे. या ठिकाणी माझ्याऐवजी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी इच्छा असून यात मी नाराज असल्याचा काहीही भाग नाही. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असून मी जेथून निवडणूक लढण्यासाठी तयारी केली होती, तेथून मला निवडणूक लढण्याची संधी मिळावी अशी विनंती त्यांनी पक्ष नेत्यांकडे केली आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीबाबत पक्षनेते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सचिन सावंत यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तिथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो, असे सावंत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.