अजितदादांनी ओढवून घेतला आणखी एक वाद!
आता बारामतीतील (Baramati) एका माणसाचे नाव सांगा, जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का (MOCCA) लागत होता. माझे सहकारी आले, त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा मला वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस. परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही, असे म्हणत एकावर होत असलेल्या मोक्का कारवाईतून त्याला वाचविल्याचे जाहीरपणे सांगितल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे.
जाहीर भाषणात मोकळे-ढाकळे बाेलण्याची सवय असल्याने अजित पवार यांनी आत्तापर्यंत अनेक वाद ओढवून घेतले आहेत. त्यामध्ये आणखी एकाची भर आता पडली आहे. बारामतीतील जुन्या मंडईच्या ठिकाणी एक मोठे कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे, त्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार हे निरावागजमधील सभेत देत होते. यावेळी ते म्हणाले, आता बारामतीमध्ये एका माणसाचे नाव सांगा, जो दादागिरी करतो, त्याला बघून मी घेतो. सर्वांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. दादागिरी, गुंडगिरी चालणार नाही. नानाच्या एका ओळखीच्या माणसाला मोक्का लागत होता. माझे सहकारी आले, त्यांनी मला सांगितलं आणि म्हणाले दादा मला वाचवा. त्यांना म्हणालो एवढ्याच वेळेस. परत चुकला तर अजित पवाराकडे यायचे नाही, मला अधिकारी म्हणाले दादा तुम्ही एवढं कडक वागतात आणि अशा गोष्टींना कसे पाठीशी घालता? तेव्हा माझा कमीपणा होतो. पण जीवाभावाची माणसं म्हणून मलाही अडचण होते.
पवारांनी जुन्या भाजी मंडईतील आठवणीतील किस्से सांगितले. यातील एक किस्सा होता, भाजी मंडईतील दादागिरीचा! त्यांनी सांगितलं की, नानाला (विश्वास देवकाते) विचारा... नानाचा एक जवळचा माणूस मोक्कामध्ये गुंतत होता, पण त्याला आपण वाचवले.
भाजी मंडई म्हणजे बारामतीचे नाक आहे किंवा हृदय आहे. पूर्वी तिथे भाजी मंडई होती. त्या ठिकाणी सभा व्हायच्या. अगदी बसायलाही जागा पुरायची नाही. बाजूला फळे विकायचे, नीट सायकलदेखील लावता येत नव्हती, मात्र अचानक कोणीतरी यायचं आणि त्या भाजी विक्रेत्याच्या समोरची भाजी स्वतःच्या पिशवीत टाकून घेऊन जायचं. ती काही दादा लोकं यायची आणि त्यांना मुकाटपणे द्यावं लागायचं. हे फुकटचं कशाला विचारलं तर शेजारच्या विक्रेत्याने सांगितलं, की नाही, ती मोठी माणसं आहेत. मग मी म्हणालो, अरे कसली मोठी माणसं? कष्ट आपले, घाम आपला, पीक आपलं आणि ह्यांनी फुकट घेऊन जायचं हा कसला न्याय? असं अजित पवार सांगत होते.
अजित पवारांच्या या वक्तव्यावर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या , "हे प्रचंड गंभीर आहे. कायदा सुव्यवस्था आणि प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी सरकारची आहे. सरकारमधील उपमुख्यमंत्रिपदावरची अत्यंत जबाबदार व्यक्ती इतक्या बेजबाबदार पद्धतीने वक्तव्य करत असेल, तर हे गंभीर आहे. आमचं सरकार आहे, तर आम्ही मोठ्यातल्या मोठ्या गुंडाला वाचवू आणि आमचा विरोधक असेल तर सज्जनातल्या सज्जन माणसाला आम्ही त्रास देऊ. या सर्व गोष्टीमुळे लोकांमध्ये त्यांची प्रतिमा काय होते, याचा त्यांनी विचार करायला पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या नेत्या सक्षणा सलगर यांनीही प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली, त्या म्हणाल्या, जेव्हापासून अजितदादांनी शरद पवारांसोबत फारकत घेतलेली आहे. तेव्हापासून अजित दादा पार्ट २ नावाचा पिक्चर सुरू झाला आहे. पार्ट वन मध्ये अजितदादा बाहुबली होते, पण पार्ट टू मध्ये ते भल्लाळ देव झाले आहेत. नैतिकता नावाची गोष्टच अजित दादांकडे शिल्लक राहिली नाही. कालपर्यंत त्यांच्याकडचे आमदार फार भारी होते. ते आमदार किती कर्तबगार होते. काल दादा शहाणपणाने सांगत होते की, नीलेश लंके तिकडे जातोय, तर त्याला राजीनामा द्यावा लागेल. पक्षांतरबंदी कायदा आहे. मग २ जुलै २०२३ रोजी काय होतं. गद्दारी करून शरद पवार साहेबांना त्रास देताना हे आठवलं नाही का? तुमच्याकडे असलं की बाळ आणि दुसऱ्याकडे गेले की कार्टे, हा न्याय असू शकत नाही. हे अजितदादांना शोभत नाही. तुम्ही शरद पवार साहेबांसोबत होता, तेव्हा तुम्ही दादा होता आता भाजपच्या ताटाखालचे मांजर झाले आहात.