वाशी बाजार समितीमधील कारवाई थोरल्या पवारांची रसद तोडण्यासाठी?

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर बाजारपेठ अशी ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.

संग्रहित छायाचित्र

शिरुर, सातारा मतदारसंघावर प्रभाव असणारे आणि पवारांविषयी आपुलकी असणारे अनेक व्यापारी बाजारपेठेत

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर बाजारपेठ अशी ओळख असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Mumbai APMC) लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या खंद्या आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत समर्थकांचा एकगठ्ठा वावर समितीवर आहे. शिरुर, सातारा मतदारसंघावर मोठा प्रभाव असणारे मान्यवर व्यापारी वाशीच्या बाजार समितीत कार्यरत बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांमध्ये थोरल्या पवारांविषयी नेहमीच आपुलकीची भावना आहे 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव, सांगली-सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील राजकारणावर पकड असणाऱ्या बडया व्यापारी नेत्यांचा प्रभाव येथे दिसून येतो.फोडाफोडीच्या राजकारणानंतरही बरेच व्यापारी थोरल्या पवारांसोबत आहे. सातारा, शिरुर मतदारसंघातील आर्थिक, राजकीय पटावरील सोंगट्या येथून हलविल्या जात असल्याचे लक्षात येताच आता पवारनिष्ठांची गुन्हे शाखेने सुरु केलेली धरपडक लक्षवेधी ठरली आहे.

बाजार आवाराच्या सक्षमीकरणाच्या निमित्ताने केली जाणारी कोट्यवधींची कामे, माथाडी कामगारांच्या नावाने केले जाणारे एकगठ्ठा मतांचे राजकारण हे वाशीबाजारपेठेला नवे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असताना शरद पवार, अजित पवार, दिलीप ‌वळसे पाटील, छगन भुजबळ आदी दिग्गज नेत्यांच्या मांडवाखाली वावरणाऱ्या अनेक व्यापारी नेत्यांचा बाजारांवर प्रभाव राहिला आहे. शशिकांत शिंदे, रविंद्र इथापे, संजय पानसरे, अशोक वाळुंज, अशोक गावडे, शंकर पिंगळे, बाळासाहेब बेंडे, नरेंद्र पाटील, विलास हांडे, अशोक हांडे यासारखे व्यापारी पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांवर प्रभाव राखून आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर मुंबईतून पाच संचालक निवडून जातात. राज्यभरातून बाजार समितीवर शेतकरी गटातून १६ संचालक निवडून येतात. हजारो कोटींच्या उलाढालीचे केंद्र असणाऱ्या बाजारांवर मुंबईतील पाच आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या रुपाने एक माथाडी अशा सहा संचालकांचा दबदबा आहे. बाजार समितीच्या कारभारावर पणन विभाग, पणन मंत्री, मुख्यमंत्र्यांचा प्रभाव असतो. मात्र, कोणीही कोठेही असो वाशीची बाजारपेठ चालते ती याच पाच-सहा संचालकांच्या बळावर.

पवारांसाठी दुखरी नस ?

गेल्या काही वर्षांत बाजारपेठेत शेकडो कोटी रुपयांची वेगवेगळी कंत्राटे काढण्यात आली आहेत.त्यानिमित्ताने  शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समितीमधील अधिकारी आणि इतरही काही संचालकांविरोधात तक्रारी केल्या. सुरुवातीला याकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हते. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार आणि सातारा मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार शशिकांत शिंदे थोरल्या पवारांसोबत राहिले आणि राजकीय गणिते बदलली. 

बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांमध्ये थोरल्या पवारांविषयी नेहमीच आपुलकीची भावना आहे. राज्यात केंद्रात सरकार कुणाचेही असो थोरल्या पवारांची पकड बाजारांमधून सुटलेली नाही. शिरुर, सातारा मतदारसंघावर प्रभाव पाडणाऱ्या व्यापाऱ्यांचा एक मोठा टक्का येथे आहे. अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांना हवी ती रसद या बाजारांमधून पुरवली जात असल्याच्या तक्रारी त्यांचे विरोधक करु लागले होते. सातारा मतदारसंघात तर शौचालय घोट्यांवरुन शशिकांत शिंदे यांचे विरोधक असलेले माथाडी नेते नरेंद्र पाटील जाहीर वक्तव्य करत होते. शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हा माथाडी भवनात त्यांचा सत्कार करण्याचे सोपस्कार पाटील यांनी उरकले खरे मात्र साताऱ्यात प्रवेश करताच त्यांनी शिंदे यांच्याविरोधात आघाडी उघडली. 

पाच वर्षांपूर्वी साताऱ्यात महाराजांविरोधात नरेंद्र पाटील रिंगणात होते. तेव्हा शशिकांत शिंदे महाराजांसोबत होते. यानिमित्ताने अंतर्गत विरोधाचे एक वर्तुळ नरेंद्र पाटील यांनीही पूर्ण केले. नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने बाजारातील तगडे व्यापारी संजय पानसरे यांना अटक करताना अशोक वाळुंजे आणि शंकर पिंगळे यांचीही चौकशी केल्याचे समजते. शिरुर, साताऱ्याची थोरल्या पवारांची रसद तोडण्याची खेळी यानिमित्ताने खेळली गेल्याची चर्चा बाजारात सुरु झाली आहे. पानसरे यांना अटक होत असेल तर आपले काय अशी भीती बाजारावर पसरली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest