संग्रहित छायाचित्र
तानाजी करचे
वयस्कर झालेल्या माणसाची आपण किंमत करत नाही हा विचारच मला वेदना देऊन गेला. कारण पुढची 10 वर्षे दुसऱ्या व्यक्तीकडून लाभ मिळणार आहे. याच्यासारखा (अजित पवार) नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणे आहे, असा निशाणा साधत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) चांगलेच संतापले आहेत.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत बंड केले. या बंडाबद्दल त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी प्रथमच भूमिका मांडली. काटेवाडीतील ग्रामस्थांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधताना श्रीनिवास पवार म्हणाले की, "तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, मी दादांच्या (अजित पवार) विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. चांगला काळ असेल, वाईट काळ असू दे, नेहमी दादांच्या (अजित पवार)बरोबर राहिलो. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादाची माझी चर्चा झाली, त्यावेळी मी त्याला म्हटलं की, आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे.
अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना श्रीनिवास पवार म्हणाले, "जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. ज्यांना कुणाला काही पदे मिळाली ती साहेबांमुळे (शरद पवार) मिळाली. साहेबांना कीर्तन करा, घरी बसा म्हटलेलं मला काही पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले. औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही.
अजित पवारांना सवाल करताना श्रीनिवास पवार म्हणाले की, "साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारला? ज्या साहेबांनी (शरद पवार) आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. 25 वर्ष मंत्री केलं. मला जर असा काका मिळाला असता, तर मी खुश झालो असतो. ही चाल कुणाची आहे ही माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासन भाजपला, आरएसएसला पवार हे नाव संपवायचे आहे. त्यातूनच ही खेळी त्यांनी खेळली आहे. त्यांनी आता पर्यंत खूप प्रयत्न केला. मात्र, ते यशस्वी होऊ शकले नव्हते. तुम्हाला इतिहास माहिती आहे, की घर फोडले की ते कुटुंब संपवता येते. जर कुटुंब एकत्र असेल तर त्या घराला काही ही होत नाही. मला हे बिलकुल पटले नाही. वय वाढले म्हणून तुम्ही साहेबांना कमजोर समजू नका,
घरातील माणूस घरच्यांना माहीत नाही. साहेबांना एकुलती एक मुलगी आहे. मला हे अजिबात पटलं नाही. साहेब जर दहा वर्ष जुने असते तर कळलं असतं. साहेबांनी काय केलं असतं? वय वाढलं म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका. "माझ्या वयाची माणसे लाभार्थी आहेत. तरूण पिढी म्हणते पुढचे पुढे बघू. साहेब कधी कुणाला आवाज चढवून बोलले का? 20-25 वर्षे साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमन मला सोडत नाही. आपण खेडेगावातील माणसे आहोत. आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो, त्यांचे औषध पाणी करतो, असे श्रीनिवास पवार म्हणाले.