संग्रहित छायाचित्र
कोलकाता - लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता आणखी दोन टप्प्यातील मतदान होणार असून या दोन टप्प्यांतील निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सभा, मेळावे, रोड शो अशा प्रकारे प्रचार सुरू आहे. असे असतानाच अभिनेते तथा भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा पश्चिम बंगालमधील मिदनापूर शहरात 'रोड शो' सुरू असताना काही लोकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या रॅलीत मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर मिदनापूर शहरात भाजपाच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul)यांच्या प्रचारासाठी मिथुन चक्रवर्ती यांची रॅली मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या रॅलीमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. मात्र, रॅली सुरू असतानाच अचानक काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक आणि बाटल्या फेकल्या. तसेच रॅलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीमुळे रॅलीत सहभागी असणाऱ्या लोकांची धावपळ उडाली. त्यामुळे रॅलीत काहीवेळ मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या रॅलीत गोंधळ झाल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. या गोंधळादरम्यान भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्येही हाणामारी झाली. मात्र, यावेळी पोलिसांनी काहीही अॅक्शन घेतली नसल्याचा आरोप आता होत आहे. तसेच या सर्व घटनेवर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. या घटनेवर पश्चिम बंगाल पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, भाजपाची रॅली सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक आणि बाटल्या रॅलीमध्ये फेकत गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेला भाजपच्या कार्यकर्त्यांनीही प्रत्युत्तर दिल्यामुळे लोकांमध्ये धावपळ झाली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र, त्यानंतर तातडीने पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच या घटनेसंदर्भात पुढील कारवाई करण्यात येईल.
तृणमूल काँग्रेसवर गुंडगिरीचा आरोप
भाजपने या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजपला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून तृणमूल काँग्रेस घाबरली आहे. त्यामुळे अशा प्रकारे गुंडगिरीचा अवलंब करत आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याचा अपमान करण्यासाठी ते इतके खाली जाऊ शकतात. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते तृणांकुर भट्टाचार्य यांनी भाजपाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही अशा कृत्यांवर विश्वास ठेवत नाही. त्यांचा रोड शो ‘फ्लॉप’ होत असल्याचे दिसून येताच भाजपाने हे नाटक केले, असेही तृणांकुर भट्टाचार्य यांनी म्हटले आहे.