संग्रहित छायाचित्र
पाटणा: बिहारमध्ये कधी पूल कोसळल्याच्या घटना देशभरात चर्चेत होतात. तर कधी रस्ते चोरीला गेल्याच्या घटनांनी बिहार राज्य चर्चेत येते. आता बिहारमध्ये एका घराची बाल्कनी कोसळल्याची देशभरात चर्चा होत आहे. कारण, याच बाल्कनीवर थांबून शेकडो लोक कार्यक्रमाचा आनंद घेत होते. छपरा जिल्ह्यातील ही दुर्घटना आहे. मंगळवारी (३ सप्टेंबर) रात्री उशिरा महाविरी आखाड्यात ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमादरम्यान बाल्कनी कोसळल्याने अपघात घडला. जखमींवर इसुआपूर सार्वजनिक आरोग्य केंद्र रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील इसुआपूर जत्रेसाठी ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे छपरा जिल्ह्यात यंदाही महावीर मेळावा ध्वज मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये अनेक वाद्यवृंदांचाही सहभाग होता. यावेळी खास बोलावलेल्या ऑर्केस्ट्राचा आनंद घेण्यासाठी हजारो लोक जमा झाले होते. कार्यक्रम पाहण्याकरिता उभा राहण्याकरितादेखील जागा नव्हती. त्यावर मार्ग काढत काही लोकांनी जवळ असलेल्या एका घरातील बाल्कनीवर तुफान गर्दी केली. मात्र, कार्यक्रम रंगात आला असताना अचानक बाल्कनी कोसळली. या दुर्घटनेत १०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले.
घटनास्थळी जखमींनी आरडाओरडा केला. तर अनेकांनी घाबरून कार्यक्रमातून पळ काढला. आरडाओरडा झाल्यानंतर नागरिकांची एकच पळापळ झाली. बाल्कनी कोसळल्यानंतर शेकडो लोक जमिनीवर कोसळले. काही लोकांनी अनियंत्रित जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही कार्यक्रमस्थळी चेंगराचेंगरी झाली. जखमी झालेल्या सर्व लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती समोर येत आहे. कार्यक्रम पाहताना दुर्घटना होईल, अशी कुणालाही शक्यता वाटली नव्हती. पण, कार्यक्रमाच्या रंगाचा बेरंग होईपर्यंत लोकांनी बाल्कनीवर एवढी गर्दी का केली होती? गर्दीला नियंत्रित करण्याकरिता पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणा नव्हती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बिहारमध्ये धार्मिक कार्यक्रम, उत्सव आणि विविध घरगुती कार्यक्रमांमध्ये महिला डान्सरला आमंत्रित करण्याची पद्धत आहे. त्यामुळे अनेकदा अशा कार्यक्रमांवेळी बार गर्ल्ससोबत मद्यधुंद होऊन तरुण नृत्य करतात. तर अनेकदा जमाव अनियंत्रित होऊन दुर्घटनादेखील घडतात. यापूर्वी कार्यक्रमात आनंदाच्या भरात तरुणांनी बंदुकीच्या फैरी झाडल्याच्या घटना घडल्या आहेत.