संग्रहित छायाचित्र
#नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असलेले कालीचरण महाराजांनी पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराजांनी मुस्लीम धर्माविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात मुस्लीम समाज आक्रमक झाला आहे. रामगिरी महाराजांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी करत हिंदू संघटनांकडूनही मोर्चा काढला जात आहे. श्रीरामपूरमध्येही रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आता कालिचरण महाराजांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
यावेळी कालीचरण महाराज यांनी गांधीजींनी दिलेला अहिंसा परमोधर्म हा मंत्र अत्यंत भंपक असल्याचे सांगत तो ५०० टक्के चुकीचा असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही त्यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आज पुन्हा एकदा कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. चांगल्याला छेडायचे नाही आणि वाईटाला सोडायचे नाही हाच खरा मंत्र असल्याचे कालीचरण महाराज यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, भगवान श्रीरामाने हिंसा केली, कृष्णचंद्र महाराजांनी महाभारत युद्धात १६६ कोटी दुष्टांना मारून टाकले. हिंसेशिवाय भूलोकावरील भार हलका होणे शक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज, कृष्णचंद्र, रामचंद्र प्रभू, गुरू गोविंद सिंह महाराज, राणा प्रताप यांच्या पावलावर मस्तक ठेवून आपण चालले पाहिजे. तरच राष्ट्राचा आणि धर्माचे संरक्षण होईल. वृत्तसंंस्था