टॉप 5 पैकी कोण सर्वश्रेष्ठ स्पर्धक ‘झलक दिखला जा’ सीझन 11 चा किताब पटकावणार

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ या सेलिब्रिटी डान्स रियालिटी शो मध्ये अंतिम फेरीतील टॉप 5 स्पर्धकांच्या घोषणेसह विजेते पदासाठीची अंतिम लढत सुरू झाली!

JhalakDikhhlaJaaSeason11,top5contestants

टॉप 5 पैकी कोण सर्वश्रेष्ठ स्पर्धक ‘झलक दिखला जा’ सीझन 11 चा किताब पटकावणार

‘झलक दिखला जा’ हा प्रसिद्ध सेलिब्रिटी डान्स रियालिटी शो भारतातील आपल्या मूळ स्थानी परतला आणि सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर नोव्हेंबर 2023 मध्ये त्याचा हा सीझन सुरू झाला. या शोमधल्या सेलिब्रिटी स्पर्धकांचा डान्सर नसल्यापासून ते डान्सर असल्यापर्यंतचा चमकदार प्रवास प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा होता. या सीझनमध्ये ऋत्विक धनजानी आणि गौहर खान या दोघांनी होस्ट म्हणून कामगिरी केली आणि आपल्या चातुर्याने आणि मोहकतेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फराह खान, अर्शद वारसी आणि मलाइका अरोरा या FAM त्रिकूटाने या शोमध्ये परीक्षणाचे आणि स्पर्धकांना प्रेरणा देण्याचे काम केले. अखेरीस या सीझनच्या टॉप 5 स्पर्धकांची निवड झालेली आहे. यातील प्रत्येक स्पर्धकाने आपल्या डान्स कौशल्याने, परिश्रमाने आणि सर्जनशीलतेने प्रेक्षक आणि परीक्षक दोघांना प्रभावित केले आहे. त्याचमुळे ते या सीझनमधले सर्वोत्तम 5 विजेतेपदाचे दावेदार ठरले आहेत. विजेतेपदासाठीची अंतिम चुरस आता सुरू झाली आहे आणि समस्त देशाला प्रभावित करण्यासाठी हे टॉप 5 कलाकार अखेरचा निकराचा प्रयत्न करणार आहेत.

उपांत्य फेरीत एकमेकांना काट्याची टक्कर देऊन अंतिम फेरीत पोहोचलेले 5 स्पर्धक आहेत – टीव्ही कलाकार शोएब इब्राहीम आणि त्याची कोरिओग्राफर अनुराधा आयंगर, सेलिब्रिटी टीन अभिनेत्री अद्रिजा सिन्हा आणि तिचा कोरिओग्राफर आकाश थापा, भारतीय पार्श्वगायक श्रीराम चंद्र व त्याची कोरिओग्राफर सोनाली कर, सोशल मीडिया गाजवणारी मनीषा रानी व तिचा कोरिओग्राफर आशुतोष पवार आणि डॉक्टर व अॅक्टर धनश्री वर्मा व तिचा कोरिओग्राफर सागर बोरा.

शोएब इब्राहीमचा ‘झलक दिखला जा’ वरील प्रवास त्याची पत्नी दीपिका कक्कडचे ‘झलक दिखला जा’ मध्ये झळकण्याचे हरपलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू झाला होता. सुरुवातीचा त्याचा पदन्यास अपेक्षेपेक्षा थोडा उणा पडणारा होता पण शोएबचा दृढ निर्धार आणि अथक परिश्रम यामुळे चित्र पालटले. आपल्या प्रत्येक परफॉर्मन्समधून त्याने केवळ आपले डान्सिंग कौशल्य दाखवले नाही, तर त्याच्या प्रत्येक कृतीतील पॅशन आणि वचनबद्धता देखील त्यामधून प्रदर्शित झाली. त्याच्या मार्गात अनेक अडथळे आले, पण शोएबची चिकाटी आणि निष्ठा यांचे अखेर चीज झाले आणि टॉप 5 मध्ये त्याला स्थान मिळाले. अंतिम फेरीत पोहोचल्याचा आनंद व्यक्त करताना शोएब म्हणाला, “दीपिकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या प्रवासाची सुरुवात झाली होती. पण, हळूहळू तो माझा स्वतःचा संस्मरणीय प्रवास होत गेला. हा अनेक चढ-उतारांचा भावनिक प्रवास होता. ‘झलक दिखला जा’ हा माझ्यासाठी मोठे परिवर्तन घडवून आणणारा, माझी क्षितिजे विस्तारित करणारा अनुभव होता, ज्याने मला एक डान्सर आणि एक व्यक्ती म्हणून विकसित होण्यासाठी प्रोत्साहित केले. यातील प्रत्येक परफॉर्मन्स हा स्व-शोधाचा प्रवास होता. मी कधी विचारही केला नव्हता अशा पद्धतीने स्वतःला अभिव्यक्त करण्याची ही मला मिळालेली संधी होती. फिनालेमध्ये जिंकणे हेच केवळ माझे लक्ष्य नाही. हा प्रवास, यात आलेले कडूगोड अनुभव आणि आठवणी नेहमीच माझ्यासोबत राहतील. प्रत्येक मत, प्रोत्साहनाचा शब्द आणि कौतुक याबद्दल मी आभारी आहे, कारण त्यामुळेच मी हा क्षण उपभोगतो आहे.”

2005 मध्ये इंडियन आयडॉल 5 मध्ये विजेता ठरल्यानंतर श्रीराम चंद्रने आपला मोहरा दुसऱ्या आव्हानाकडे वळवला. डान्सविश्वाशी अनभिज्ञ असलेल्या श्रीरामने या स्पर्धेत मात्र आपले अष्टपैलूत्व दाखवले. त्याने केवळ एक अज्ञात प्रांत जिंकला नाही, तर आपल्या परफॉर्मन्सेसने सगळ्यांच्याच मनावर आपली छाप सोडली. टॉप 5 मध्ये दाखल होण्याचा आपला आनंद व्यक्त करताना श्रीराम म्हणाला, “माझी पार्श्वभूमी गायनाची असल्याने डान्स फ्लोरवर पाऊल टाकणे हे माझ्यासाठी कठीण काम होते. पण, प्रत्येक परफॉर्मन्सगणिक मी स्वतःला रेटा देत होतो. त्यातून डान्सबद्दल मला प्रेम वाटू लागले. हा अनेक चढ-उतारांचा प्रवास होता जो आव्हाने, नवीन बोध देणारे अनुभव आणि अविस्मरणीय क्षणांनी भरलेला होता. या संपूर्ण प्रवासात मी एक कलाकार आणि एक माणूस म्हणून मोठा झालो. मी हे शिकलो की, निष्ठा, कठोर परिश्रम आणि स्वतःवर विश्वास असल्यास काहीही साध्य करता येऊ शकते. माझ्या सह-स्पर्धकांशी माझे जे घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे, ते मला सदैव साथ करेल आणि हा शो संपल्यानंतर मला त्यांची आठवण येईल!”

अद्रिजा सिन्हा म्हणजे या सीझनमधली ‘छोटा पॅकेट बडा धमाका’. या शोमध्ये आपल्या दमदार परफॉर्मन्सेसने ती इतर स्पर्धकांना काट्याची टक्कर देत होती. अद्रिजा या शो मध्ये लवकरच ‘परफेक्ट स्कोअर क्वीन’ म्हणून प्रसिद्ध झाली होती. परीक्षक अर्शद वारसी कडून अनेकदा तिला जादू की झप्पी मिळाली. आपल्या परिपूर्ण परफॉर्मन्सेसने तिने नेहमी प्रेक्षकांना प्रभावित केले. अद्रिजा म्हणते, “‘झलक दिखला जा’ च्या टॉप 5 मध्ये येणे हे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. या माझ्या प्रवासात माझे कुटुंब, मित्रमंडळी आणि चाहते हे माझे आधारस्तंभ होते. प्रत्येक परफॉर्मन्समधून मी नवीन काही शिकत होते. त्यातून मला नवनवीन आव्हाने मिळत होती आणि एक डान्सर म्हणून माझी प्रगतीही होत होती. माझी सह-स्पर्धकांविषयी मला नितांत आदर वाटतो. दर आठवड्याला माझ्यातील उत्तम कलाकार बाहेर काढण्यासाठी त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले. या शोमध्ये मी आयुष्यभर साथ देणाऱ्या आठवणी आणि मैत्रीचे नाते मिळवले आहे. आता फिनालेमध्ये संपूर्ण योगदान देण्यासाठी मी सज्ज आहे.”

दिलों की रानी मनीषा रानीने या शोमध्ये प्रेक्षकांचे मन तत्काळ जिंकून वाइल्ड कार्ड एंट्री मिळवली होती. एका पाठोपाठ एक अनेक आठवडे तिने विविध डान्स शैली सादर करून आपले अष्टपैलूत्व दाखवले आणि अशक्य काहीच नाही हे दाखवून दिले. डान्सिंग कौशल्याव्यतिरिक्त मनीषाने आपल्या डायनॅमिक व्यक्तिमत्वाने आणि गोड स्वभावाने सगळ्यांना मोहित केले. मात्र तिने हे देखील सिद्ध केले की तिला मिळालेले स्थान तिच्या गोड व्यक्तिमत्वामुळे नाही, तर तिच्या डान्सिंग कौशल्यामुळेच आहे. आपल्या या यशाबद्दल बोलताना मनीषा म्हणते, “फिनाले मध्ये पोहोचणे ही एक सिद्धी तर आहेच पण आत्तापर्यंतच्या या शोमधल्या माझ्या प्रवासाचा तो गौरव आहे. फिनाले आता तोंडावर आला आहे आणि अविस्मरणीय परफॉर्मन्स देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. इतक्या गुणी आणि हुशार परफॉर्मर्ससोबत एका मंचावर प्रस्तुती देणे हा माझ्यासाठी गौरवाचा भाग आहे. प्रत्येक आठवड्यात माझ्यातील सर्वोत्तम प्रतिभा बाहेर काढण्याबद्दल माझा कोरिओग्राफर आशुतोषचे आणि समस्त टीमचे मी आभार मानते. मला आपले मत देणाऱ्या आणि माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या सर्व चाहत्यांची मी मनापासून आभारी आहे.”

एका मोठ्या दुखापतीतून बाहेर आल्यावर 2 वर्षांनंतर धनश्री वर्माने डान्सिंगमधली आपली दुसरी इनिंग सुरू केली आणि या शोच्या अंतिम फेरीत धडक देऊन सगळ्यांना धक्का दिला. तिचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्यात अनेक चढ-उतार होते. पण निर्धार आणि चिकाटी यामुळे ती अडचणींवर मात करू शकली. या शोमधल्या आपल्या प्रवासाविषयी बोलताना धनश्री म्हणाली, “प्रत्येक आठवड्यात मी स्वतःला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकलत होते, नवनवीन डान्सिंग स्टाइल आजमावून बघत होते आणि आव्हाने स्वीकारत होते. हा असा मंच आहे, ज्याने दुखापतीनंतर मरगळलेल्या माझ्या मनाला डान्स करण्याची उभारी दिली. डान्स पहिल्यापासून माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. ‘झलक दिखला जा’ च्या माध्यमातून मी नवीन शैली आणि प्रकार धुंडाळले आहेत. या अनुभवातून मी स्वतःविषयी आणि माझ्या क्षमतांविषयी अधिक जाणू शकले. अनेक आव्हाने आणि अपयशातही माझ्या स्वप्नावरील माझे लक्ष कधीच ढळले नाही. हा प्रवास माझे स्वप्न साकारणारा होता आणि येथील प्रत्येक क्षणबद्दल मी कृतज्ञ आहे.”

 

विजेतेपदाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार हे जाणून घेण्यासाठी अवश्य बघा ‘झलक दिखला जा’चा ग्रँड फिनाले 2 मार्च रोजी रात्री 8 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story