संग्रहित छायाचित्र
दिग्गज अभिनेता आमिर खानने नुकतीच माजी पत्नी किरण रावबद्दल चर्चा केली आहे. अजूनही तिच्या प्रेमात असल्याची कबुली देत किरण त्याच्या आयुष्यात आली, यासाठी तो स्वतःला भाग्यवान समजतो.बीबीसी न्यूज इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आमिरने किरण रावबद्दल सांगितले, ‘‘किरण माझ्या आयुष्यात आली, याबद्दल मी खूप कृतज्ञ आणि भाग्यवान आहे. आम्ही १६ सुंदर वर्षे एकत्र घालवली आहेत. मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. ती एक अद्भूत महिला आहे. एक उत्तम दिग्दर्शकही आहे.’’
घटस्फोट झाल्यानंतरही आमिर आणि किरण यांच्यात चांगले संबंध आहेत. यावर अभिनेता म्हणाला, ‘‘यात काही रहस्य नाही. ती एक चांगली व्यक्ती आहे आणि मी तितका वाईटही नाही. यामुळे आमचे चांगले जमते. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. आम्ही एकमेकांचा आदर करतो. आमचं नातं थोडं बदललं असेल, पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं, ते कमी झालं आहे.’’
‘लापता लेडीज’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्याने किरण रावची निवड का केली, हेदेखील आमिरने सांगितले. तो म्हणाला, ‘‘जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा माझ्या मनात पहिले नाव आले ते किरण. कारण मला वाटते की ती एक प्रामाणिक दिग्दर्शक आहे. ही एक नाट्यमय कथा आहे आणि मला एका दिग्दर्शकाची गरज होती जी ती अगदी प्रामाणिकपणे सांगेल.’’
एकदा किरणने स्क्रिप्ट किंवा चित्रपटाची जबाबदारी घेतली की ती तिच्यातील सर्व काही देते. मला माहित आहे की चित्रपटासाठी जे काही आवश्यक आहे ते मिळण्यासाठी मी तिच्यावर अवलंबून राहू शकतो, असे आमिर म्हणाला. १६ वर्षांच्या लग्नानंतर आमिर आणि किरण यांनी २०२१ मध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. त्यांना एक मुलगा आहे. २०११ मध्ये सरोगसीद्वारे त्याचा जन्म झाला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.