Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड, १ कोटी रुपये देण्याची मागणी

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन मागील काही काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील जुबली हिल्स येथील घराबाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी रविवारी संध्याकाळी गोंधळ घातल्याची घटना घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 23 Dec 2024
  • 12:55 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन मागील काही काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला एक रात्र तुरुंगात काढावी लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील जुबली हिल्स येथील घराबाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी रविवारी संध्याकाळी गोंधळ घातल्याची घटना घडली. आंदोलकांनी घराबाहेर घोषणाबाजी करत दगडफेक केली. या प्रकारामुळे अल्लू अर्जुनच्या घराबाहेर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या ८ सदस्यांनी त्याच्या घरावर हल्ला केला. अल्लु अर्जुनचा पुतळा जाळला, घराबाहेरच्या कुंड्या तोडल्या आणि विरोध प्रदर्शन केलं. यानंतर पोलिसांनी आठ लोकांना अटक केली. यावेळी अल्लु अर्जुन घरी नव्हता. मात्र त्याची पत्नी स्नेहा रेड्डी आणि मुलं अरहा, अयान हे घरीच होते.

संध्या थिएटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेला 1 कोटी रुपये देण्याची मागणी आंदोलकांनी केली. यासोबतच तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि औषधोपचाराची जबाबदारी उचलावी, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जेएसीच्या 8 आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. जुबली हिल्स पोलिस स्टेशनचे अधिकारी म्हणाले की, आंदोलक हे उस्मानिया विद्यापीठाशी संबंधित आहेत.

संध्या थिएटर दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना अल्लू अर्जुनने यापूर्वीच मृत्युमुखी पडलेल्या महिलेला 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याचे वचनही दिले आहे. अल्लू अर्जुनने चाहत्यांना सोशल मीडियावर संयम राखण्याचे आवाहन करत कोणत्याही प्रकारचे अपशब्द वापरणे टाळावे असे सांगितले. अभिनेत्याने या संदर्भात एक पोस्ट शेअर करत गोंधळाबद्दल खेद व्यक्त केला. तसेच, चुकीची माहिती पसरवण्याच्या विरोधात आवाज उठवत, कुटुंबाची सहानुभूती राखण्याचे आवाहन केले.

या घटनेनंतर अल्लू अर्जुनच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, आणि परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, घरावर झालेल्या हल्ल्यानंतर अल्लू अर्जुन त्याच्या पत्नी आणि मुलांसह घराबाहेर जातानाचा व्हिडिओ देखील दिसत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story