संग्रहित छायाचित्र
मराठी मनोरंजन विश्वात २०२४ मध्ये प्रेक्षकांना अनेक वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे पाहायला मिळाले. आता येत्या वर्षात बॉक्स ऑफिसवर नवीन काय पाहायला मिळणार याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आता २०२४ च्या वर्षाखेरीस पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित सिनेमाची पहिली झलक निर्माते व दिग्दर्शकांनी समोर आणली आहे.
गेल्या काही दिवसांपासून स्वप्नील जोशीच्या ‘जिलबी’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. याशिवाय सध्या सगळे प्रेक्षक स्वप्नीलच्या गुजराती चित्रपटाची सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत. या चर्चा सुरू असतानात अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. स्वप्नीलने त्याच्या आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा केलेली आहे.
स्वप्नील या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणार आहे. स्वप्नीलचा ‘सुशीला- सुजीत’ हा सिनेमा पुढच्या वर्षी १८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सुशीला- सुजीत’ या सिनेमाचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख स्वप्नीलने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत जाहीर केली आहे.
‘सुशीला- सुजीत’मध्ये स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ‘सुशीला- सुजीत’ या चित्रपटाचा नेमका विषय नक्की काय आहे? आणखी कोणकोणते कलाकार यात दिसणार हे अद्याप समोर आली नाही. चित्रपटाची कथा व दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद ओकने सांभाळली आहे.
प्रसाद ओकने आतापर्यंत कच्चा लिंबू, चंद्रमुखी, आणि हिरकणी सारख्या दमदार चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यामुळे प्रसाद-स्वप्नीलची जोडी रुपेरी पडद्यावर काय जादू दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटाची निर्मिती प्रसाद ओक, मंजिरी ओक, संजय मेमाणे, निलेश राठी आणि स्वप्नील जोशी असे पाच जण मिळून करणार आहेत. प्रेक्षकसुद्धा ही आगळीवेगळी कथा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.