तितीक्षाची लगीनघाई!
पूजा पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं दिसते. प्रथमेश-क्षितिजा, शिवानी-अजिंक्य या जोडप्यांपाठोपाठ आता लवकरच मालिका विश्वातील प्रसिद्ध जोडी तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके हे विवाहबंधनात अडकणार आहे.
तितीक्षा तावडे, सिद्धार्थ बोडके यांनी ८ फेब्रुवारीला इन्स्टाग्रामवर केळवणाचा फोटो शेअर करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. यानंतर त्यांचे जवळचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांनी या दोघांचं केळवण मोठ्या उत्साहात केले होते. आता लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला मालिका विश्वातील बरेच कलाकार उपस्थिती लावणार आहेत हे नक्की. अनघाअतुल, ऋतुजा बागवे यांनी खास इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनघाने “वऱ्हाड निघालं बरं का!” अशी स्टोरी शेअर करत तितीक्षा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले आहेत. याशिवाय स्वत: तितीक्षाने मेहंदी सोहळ्याची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. या दोघांनी अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नसली तरीही लगीनघाई पाहता लवकरच हे जोडपं लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ आणि तितीक्षाने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तितीक्षाला मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलिवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.