पुरस्कार नामांकनात 'बापल्योक' चित्रपटाची बाजी
गौरविल्या गेलेल्या ‘बापल्योक’ चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार आणि मटा सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या नामांकन विभागातही दमदार बाजी मारली आहे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात तब्ब्ल १७ आणि मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात ३ नामांकने मिळवत ‘बापल्योक’ चित्रपटाने आपली छाप पाडली आहे.
मकरंद माने दिग्दर्शित ‘बापल्योक’ चित्रपटाने आजवर अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली आहे. आता झी चित्र गौरव पुरस्कार नामांकनामध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, छायांकन ,संगीत गीतकार, गायक, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, कलादिग्दर्शन, संकलन, अभिनेता सहाय्यक अभिनेता, साऊंड डिझायनर अशा १७ विभागांमध्ये नामांकने मिळाली आहेत तर मटा सन्मान पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, गीतकार, संगीत दिग्दर्शन या तीन विभागासाठी नामांकने आहेत.
‘बापल्योक’ चित्रपट आपले वेगळेपण सिद्ध करणार याबद्दल खात्री होती. सशक्त आशयाचा हा चित्रपट आणणे आव्हानात्मक होते. आमच्या या प्रयत्नांची मोठय़ा पातळीवर दखल घेतली गेल्याचे समाधान चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे यांनी व्यक्त केले. आपल्या चित्रपटासाठी झी आणि मटा सारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे नामांकन मिळणे ही फारच आनंदाची गोष्ट असल्याचे अभिनेता शशांक शेंडे यांनी सांगितले.
वडिल मुलाच्या नात्याचे मर्म सांगणारा आणि ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे, विठ्ठल काळे पायल जाधव, नीता शेंडे यांच्या अभिनयाने नटलेल्या 'बापल्योक’ चित्रपटाचे नागराज मंजुळे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.