पश्चिम बंगालमध्ये चौधरी पक्ष सोडण्यास 'अधीर' ?
#नवी दिल्ली
अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशामुळे काँग्रेसचा महाराष्ट्रातील मोठा नेता भाजपवासी झाला. त्यांनतर काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यात पश्चिम बंगालमधील पक्षाचा चेहरा आणि लोकसभेतील काँग्रेसचे प्रमुख नेते अधीर रंजन चौधरी यांच्या नावाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. पण आता तृणमुल आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाची बोलणी होण्याची शक्यता दिसत आहे. ही डील झाल्यास पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी पक्षाची साथ सोडू शकतात. ममता बॅनर्जी आणि चौधरी यांच्यातील वितुष्ठ जुने आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या प्रत्येक निर्णयावर ते ममता बॅनर्जी यांना घेरत असतात. अशावेळी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात युती झाल्यास अधीर रंजन चौधरी पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. चौधरी नाराज असल्याचे काँग्रेसमधील काहींनी मान्य केले आहे. पण पक्षातील वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढतील, असेही काही नेत्यांचे मत आहे.
अधीर रंजन चौधरी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठे नाव आहे. आज नाही, मागच्या अनेक वर्षांपासून ते विरोधी पक्षनेते म्हणून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींशी लढत आहेत. लोकसभेसाठी बोलणी यशस्वी झाल्यास त्यांना तृणमूल काँग्रेससोबत एका व्यासपीठावर यावे लागेल. ममता सरकारबद्दल आपली भूमिका सौम्य करावी लागेल. अधीर रंजन चौधरी यांना हे टाळायचे आहे. ही तडजोड चौधरी करणार नाहीत.
तृणमुलशी आघाडी झाल्यास काँग्रेसला कमी जागा मिळणार हे अधीर रंजन चौधरी यांना माहित आहे. त्यामुळे अशी आघाडी त्यांना मान्य नाही. अधीर रंजन चौधरी यांच्या बेरहामपुरच्या जागेवरुनही दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमुलने ४२ पैकी २२ आणि भाजपाने १८ जागांवर विजय मिळवला होता. डाव्या पक्षांना एका जागेवर विजय मिळाला होता. तृणमूल काँग्रेसला त्या निवडणुकीत ४४ टक्के मते मिळाली होती. भाजपाला ४१ टक्के मते मिळाली होती. काँग्रेस पक्षाला २०१९ मध्ये पश्चिम बंगालमध्ये ६ टक्के मत मिळाली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.