आडनावाप्रमाणे आता नावातही घोळ! काय आहे गौतमीचे खरे नाव?
आधी टीका मग प्रेम आणि आता चाहत्यांचा मोठा पाठिंबा असलेली गौतमी पाटील (Gautami Patil) सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडीओमुळे खरंतर गौतमीचं नाव चर्चेत आले. पांढऱ्या-निळ्या नऊवारी साडीत केलेला अश्लील इशारा लावणी म्हणून व्हायरल झाल्याने अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र उगारलं होतं. त्यानंतर गौतमीने माफी मागून आपण आपली चूक सुधारू असे सांगितले. तिचे कार्यक्रम चालूच ठेवले. वेळेनुसार गौतमीच्या नृत्याला पुरुषांसह महिलांचीसुद्धा उपस्थिती वाढू लागली.
टीकेमुळे चर्चेत आलेली गौतमी मग प्रेक्षकांसह तिच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेकांना आवडूही लागली. तितक्यात गौतमीच्या आडनावावरून नवा वाद सुरू झाला होता. एकीकडे हे प्रकरण तापले असताना तिच्या लहानपणीच सोडून गेलेल्या वडिलांची एंट्री झाली आणि मग गौतमी व तिच्या आईच्या नावाची वेगळी चर्चा सुरू झाली होती. काहीच दिवसात आजारपणामुळे गौतमीच्या वडिलांचे निधन झाले आणि या चर्चा कमी झाल्या. चित्रपटासारखं खरं आयुष्य जगताना गौतमीचा घुंगरू नावाचा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसपर्यंत पोहोचायच्या आधीच पडला. या सगळ्यात आता गौतमीच्या खऱ्या नावावरून एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. 'सबसे कातील, गौतमी पाटील' अशा घोषणांनी प्रसिद्ध असणाऱ्या गौतमीने अलीकडेच एका कार्यक्रमात चाहतीशी गप्पा मारताना आपले नाव वेगळेच सांगितले आहे. जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात गौतमीलादेखील बोलावण्यात आले होते. तेव्हा गौतमी हिने तिच्या एका चाहतीची भेट घेतली. गौतमीने या चिमुकल्या चाहतीला तिचे नाव विचारले. तेव्हा तिने नाव वैष्णवी आहे असे सांगितले. यावर गौतमी म्हणाली, ‘माझं देखील जन्मनाव वैष्णवी असे आहे. हा खुलासा गौतमीने गप्पांच्या वेळी केला आहे. त्याचा काही पुरावा दाखवलेला नाही पण आता या वैष्णवी नावावरून गौतमी पुन्हा चर्चेत आली असे म्हणायला हरकत नाही.
दरम्यान, वर म्हटल्याप्रमाणे अशाप्रकारे गौतमीच्या नावावरून वाद होण्याची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गौतमी पाटील हिच्या आडनावावरूनसुद्धा मोठा वाद निर्माण झाला होता. गौतमी हिने पाटील हे आडनाव लावू नये असा इशारा देखील तिला देण्यात आला होता. “गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. तिने पाटील नाव लावल्यास तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला होता. यावर गौतमीच्या वडिलांनीसुद्धा त्यावेळी गौतमी ही पाटीलच आहे आणि पाटीलच नाव लावणार अशी भूमिका मांडली होती.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.