गदरची ‘अनटोल्ड स्टोरी’
सध्या सनी देओल त्याचा आगामी चित्रपट ‘गदर टू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच निर्मात्यांनी मुंबईत ‘गदर : एक प्रेम कथा’ या पहिल्या भागाचा री-रिलीज प्रीमियर आयोजित केला होता. यावेळी सनीने सांगितले की, ‘‘२२ वर्षांपूर्वी जेव्हा 'गदर' चित्रपट तयार झाला होता तेव्हा कोणीही तो विकत घ्यायला तयार नव्हते. चित्रपट विकत घेणार नाही, असे सांगून वितरक मला हाकलून देत असत, पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याने इतिहास रचला.’’ 'गदर टू' या वर्षी ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
सनी म्हणाला, ‘‘'जेव्हा 'गदर : एक प्रेम कथा' लाँच झाला तेव्हा आम्हाला माहीत नव्हते की हा चित्रपट इतका चालेल. आम्ही लोकांकडे ते विकायला जायचो तेव्हा ते हा पंजाबी चित्रपट असल्याचे सांगत तो हिंदीत डब करा असे म्हणायचे. हा चित्रपट आम्ही विकत घेणार नाही, असे काही वितरक सांगत होते.’’
‘‘हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला पण जेव्हा तो चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्याने अनेक विक्रम मोडले. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की त्याने सर्वांची तोंडे बंद केली. त्याचा दुसरा भाग बनवण्याची हिंमत जनतेनेच दिली,’’ असेही सनीने सांगितले. २००१ मध्ये रिलीज झालेला गदर: एक प्रेम कथा हा त्या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटाने त्या काळात १३३ कोटींची कमाई केली होती.