संग्रहित छायाचित्र
लोकप्रिय अमेरिकन सिटकॉम 'फ्रेंड्स' मध्ये चँडलर बिंगची भूमिका साकारणारा अभिनेता मॅथ्यू पेरी याचं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले. त्याच्या निधनाने जगभरातील चाहत्यांना धक्का बसला. मॅथ्यू पेरी त्याच्या राहत्या घरातील स्विमिंग पूलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळला होता आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.
मॅथ्यूच्या निधनानंतर, त्याचे लॉस एंजिलिसमधील घर भारतीय वंशाच्या रिअल इस्टेट डेव्हलपर आणि चित्रपट निर्माती अनिता वर्मा-लालियनने ८.५५ दशलक्ष डॉलर (७२.०४ कोटी रुपये) मध्ये विकत घेतले आहे. घर विकत घेतल्यानंतर तिने हिंदू पद्धतीनुसार पूजा केली आणि या पुजेचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. मॅथ्यूने २०२० मध्ये हे घर ६ दशलक्ष डॉलर (५०.५ कोटी रुपये) मध्ये खरेदी केले होते. ३५०० चौरस फूटांमध्ये पसरलेल्या या बंगल्यात चार बेडरुम, चार बाथरुम, लिव्हिंग रुम, डायनिंग रुम आणि किचनचा समावेश आहे. मॅथ्यूने हॉट टब जोडून स्विमिंग पूलही बांधला होता, जिथे तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. अनिता या घरात नवीन आठवणी बनवण्यासाठी उत्सुक आहे.
अनिताने घराच्या स्विमिंग पूलजवळ पूजा केली आणि म्हटलं की, हे घर विकत घेतल्याचा मला खूप आनंद आहे. घरातून पॅसिफिक महासागराचे दृश्य दिसते. त्यामुळे मी भारावून गेले आहे. तिने स्पष्ट केले आहे की, घरातील मॅथ्यूच्या काही गोष्टी तशाच ठेऊन जतन केल्या जाणार आहेत. आम्हाला हे घर आवडलं, म्हणूनच आम्ही ते विकत घेतलं आहे, असे तिने सांगितलं.
मॅथ्यू पेरी एक अमेरिकन आणि कॅनेडियन अभिनेता, लेखक होते. त्यांनी १९९४ ते २००४ पर्यंत टीव्हीवर चाललेल्या फ्रेंड्स या सिटकॉममध्ये त्यांनी चँडलर बिंगची भूमिका केली होती. या भूमिकेने त्यांना जगभर ओळखले जाऊ लागली. या भूमिकेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात हास्य आणले होते. या भूमिकेसाठी त्यांनी अनेक पुरस्कार देखील जिंकले. त्यासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.