संग्रहित छायाचित्र
जगातील पहिली विश्वसुंदरी किकी हॅकन्सन काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. वयाच्या ९५ व्या वर्षी कॅलिफोर्नियामध्ये ४ नोव्हेंबरला त्यांचे निधन झाले. राहत्या घरी झोपेतच त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. तसेच मिस वर्ल्डच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून देखील त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली आहे. १९५१ लंडन येथील लिसियम बॉलरूममध्ये आयोजित मिस वर्ल्ड ही स्पर्धा किकी यांनी वयाच्या २३ व्या वर्षी जिंकली होती.
किकी हॅकन्सन यांचा जन्म १७ जून १९२९ ला स्वीडनमध्ये झाला होता. किकी एक मॉडेल होत्या. १९५१ या वर्षी त्यांनी मिस्स स्वीडन वर्ल्ड हा खिताब जिंकला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी मिस वर्ल्ड ब्युटी पेजंट ही स्पर्धा जिंकली होती. किकी हॅकन्सन यांचा मुलगा ख्रिस अँडरसनने सांगितलं की त्याची आई ही वास्तविक, प्रेमळ, दयाळू आणि मजेदार होती. तिच्याकडे उत्कृष्ट विनोदबुद्धी तसेच तिची बुद्धी तल्लख होती. तसेच तिचं हृदय मोठं होतं.
मिस वर्ल्डच्या इंस्टाग्राम पेजवर किकी यांच्या निधनाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, पहिली मिस वर्ल्ड, स्वीडनच्या किकी हॅकन्सन यांचं सोमवारी, 4 नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियातील राहत्या घरी निधन झालं. त्या 95 वर्षांच्या होत्या. किकी यांचे झोपेत निधन झाले.