बॉलिवूडवाले फार तर रिमेक करू शकतात
बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि आपल्या हटके स्टोरीटेलिंगसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक कोणता असे म्हटले तर त्यात अनुराग कश्यपचे नाव येते. भारतातील युवा पिढीचा आवडता दिग्दर्शक म्हणून त्याची वेगळी छाप आहे. गुलाल, देव डी, गँग्स ऑफ वासेपूर, सिक्रेड गेम्स सारख्या त्याच्या कलाकृती नेहमीच चर्चेचा विषय असतात.
अनुराग हा जसा त्याच्या दिग्दर्शनासाठी ओळखला जातो तसाच तो त्याच्या परखड वक्तव्यांसाठी देखील चर्चेत राहणारा सेलिब्रेटी आहे. आपल्याला जे योग्य वाटते ते स्पष्ट शब्दांत सांगणाऱ्या अनुरागला नेटकरी त्याच्याविषयी काय बोलतात, आपण ट्रोल होत आहोत याबाबत त्याला कसलीही चिंता नसते. आता त्याने पुन्हा एकदा बॉलिवूड, बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते यांच्याविषयी परखड शब्दांत वक्तव्य केले आहे. अनुरागने मल्याळम चित्रपट 'मंजुमेल बॉईज'चा रिव्ह्यु ) केला आहे. यावेळी त्याने ज्या सडेतोडपणे बॉलिवूड आणि बॉलिवूडची स्टोरी लाईन यावर आगपाखड केली आहे. तो म्हणतो, बॉलिवूड अजूनही खूप मागे आहे. त्यांनी केवळ रिमेक तयार करावेत. मी आता मंजुमेल बॉईज नावाचा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहून माझी खात्री झाली की, बॉलिवूड रिमेकच तयार करू शकते. तशा धाटणीचा चित्रपट नाही. गेल्या महिन्यात या चित्रपटानं जगभरातून शंभर कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली होती. मंजुमल बॉईज हा मित्रांच्या टोळक्याची गोष्ट आहे. ते सगळे जण सुट्टीच्या निमित्ताने कोडायकनालला जाण्याचा निर्णय घेतात. मात्र तिथे गेल्यानंतर जे काही घडते ते सारे चक्रावून टाकणारे आहे.
दिग्दर्शकाने मोठ्या प्रभावीपणे त्याचा मेसेज हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे अनुरागने यावेळी ब्रम्हयुग नावाच्या मल्याळम चित्रपटाची देखील स्तुती केली आहे. तो म्हणतो या चित्रपटांनी हिंदी चित्रपटाला केव्हाच मागे सोडले आहे. हे चित्रपट जबरदस्त आहेत. अशा शब्दांत त्याने त्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. मुख्य चित्रपट प्रवाहात या चित्रपटांनी मोलाची भर टाकली असून येत्या काळात त्यांनी बॉलिवूडसमोर मोठे आव्हान निर्माण केल्याचं अनुरागने म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.