श्रेयस अय्यर, ईशान किशनवर कारवाईची टांगती तलवार!
मुंबई
रणजी सामने खेळण्यास टाळाटाळ करणारे श्रेयस अय्यर आणि ईशान किशन हे दोन खेळाडू सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निशाण्यावर आहेत. दोन्ही खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांमुळे रणजी सामने खेळण्याचे टाळले असल्याने मंडळाची खप्पा मर्जी झाल्याचे दिसते. आगामी आयपीएल हंगामापूर्वी इशान आपल्या तंत्रावर काम करत असल्याचे कळते. त्याचवेळी अय्यरने पाठीच्या किरकोळ दुखण्यामुळे रणजीतील सहभाग टाळला आहे. यामुळे बीसीसीआयचे उच्चपदस्थ आणि अधिकारी दोघांवर नाराज असल्याचे दिसते.
बीसीसीआय आता अय्यर आणि किशन यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे दोघांनाही नव्या केंद्रीय कराराच्या यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार अय्यर आणि किशन यांना २०२३-२४ च्या हंगामासाठी केंद्रीय खेळाडूंच्या यादीतून काढून टाकले जाईल. या निर्णयामागील कारण म्हणजे बोर्डाच्या आग्रहानंतरही त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमधून खेळणे टाळले आहे.
एका वृत्तानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने २०२३-२४ हंगामासाठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादी जवळजवळ अँतिम केली आहे. बीसीसीआय लवकरच याची घोषणा करेल. बीसीसीआयने विनंती करूनही, देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहणे दोन्ही खेळाडूंना महागात पडेल. २०२२-२३ च्या केंद्रीय करारामध्ये, इशान किशनला सी श्रेणीत, तर श्रेयस अय्यरला बी श्रेणीत ठेवले होते. यामुळे किशनला एक कोटी आणि अय्यरला तीन कोटी रुपये मिळतात. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर अय्यर भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता, मात्र दौऱ्याच्या सुरुवातीला ब्रेक घेऊन परतला होता. तेव्हापासून तो गायब आहे. ईशान किशन बडोद्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याबरोबर सराव करताना दिसला. तो हार्दिकसोबत जिममध्येही दिसला होता. बोर्डाने ईशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते, मात्र तो त्यापासून दूर राहिला.
अय्यरची तक्रार
खराब फॉर्ममुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन सामन्यांतून वगळण्यात आले होते. त्याला रणजी खेळण्याचा सल्लाही दिला होता. मात्र पाठदुखीमुळे श्रेयस रणजीपासून दूर राहिला होता. आता बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याच्या दुखापतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने श्रेयसला फिट घोषित केले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी श्रेयसला कोणतीही नवीन दुखापत नसून तो तंदुरुस्त असल्याची पुष्टी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.