...तरीही सत्ताधाऱ्यांकडे बहुमत कायम

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले तरी सत्ताधारी गटाकडे बहुमत कायम असेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तरी शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि. १६) केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 17 Apr 2023
  • 03:58 pm
...तरीही सत्ताधाऱ्यांकडे बहुमत कायम

...तरीही सत्ताधाऱ्यांकडे बहुमत कायम

सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदार अपात्र ठरवले तरी सरकार पडणार नसल्याचा अजित पवारांचा दावा

#नागपूर

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवले तरी सत्ताधारी गटाकडे बहुमत कायम असेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तरी शिंदे-फडणवीस सरकार पडणार नाही, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि. १६) केला.

सर्वप्रथम बंड करणाऱ्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्याबद्दल तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातील आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणातील सुनावणी पूर्ण झाली असून घटनापीठाने निकाल राखून ठेवला आहे. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे. दरम्यान पुढील काही दिवसात निकाल लागण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची भूमिका तसेच शिंदे गटाबाबत केलेली कठोर विधाने पाहता १६आमदारांना अपात्र ठरवण्यात येण्याची शक्यता विरोधी गटाला जास्त प्रमाणात वाटत आहे. या पार्श्वभूमीवर सत्ता टिकवण्यासाठी भाजपने अजित पवारांसोबत जवळीक साधल्याची चर्चा जोरात आहे. पवार यांनी मात्र या सर्व शक्यतांना पूर्णविराम देतानाच १६ आमदार अपात्र ठरले तरी बहुमताचे गणित सत्ताधाऱ्यांच्याच बाजूने असेल, हे स्पष्ट केले.

सत्तासंघर्षाचा निकाल येत्या काही दिवसांत लागण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र झाले तर सरकारच कोसळेल आणि त्यामुळे अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपने ‘प्लान बी’ आखला असल्याची चर्चा जोरात आहे. १६ आमदार अपात्र ठरल्यास अजित पवार राष्ट्रवादीच्या १५ आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याचे भाजप-शिवसेनेच्या काही नेत्यांकडूनही बोलले जात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तरी, शिंदे-फडणवीस सरकारकडे बहुमत कायम राहील, हे अजित पवार यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले.    

‘‘आजघडीला अपक्ष आमदारांसह भाजपकडे ११५ सदस्यांचे संख्याबळ आहे. शिंदे गटाचे ४० आमदार मिळून हा आकडा १५५ इतका होता. या व्यतिरिक्त सरकारला इतर १० आमदारांचेही समर्थन आहे. असे मिळून सरकारला एकूण १६५ आमदारांचे समर्थन आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र ठरवले तरी सरकारला १४९ आमदारांचे समर्थन कायम राहील. विधानसभेत बहुमताचा आकडा हा १४५ आहे. त्यापेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे असतील,’’ असे गणित अजित पवार यांनी उलगडून सांगितले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest