संग्रहित छायाचित्र
नागपूर : पृथ्वीवर वेगाने होत असलेल्या हवामान बदलामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, हिवतापासारख्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांची शक्ती चारपट वाढली आहे. एवढेच नाही तर डासांची प्रजननक्षमताही वाढली असल्याची माहिती चेन्नईतील आरोग्य सल्लागार डॉ. जयालक्ष्मी श्रीधर यांनी केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे.
नागपूर येथे आयोजित केलेल्या एका कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी त्या येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या म्हणाल्या, हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, कमी कालावधीत अधिक पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्याचवेळी विविध आजार पसरवणाऱ्या डासांच्या वाढीसाठीसुद्धा हवामान बदल हा घटक कारणीभूत ठरला आहे. राज्यात सध्या डेंग्यू आणि चिकनगुनिया आजाराची साथ सुरू आहे. डासांमुळे पसरणाऱ्या आजारासाठी पूरक वातावरण आहे.
हवामानातील बदलामुळे डासांची भौगोलिक व्यापकता वाढली आहे. ज्या भागात काही दशकांपूर्वी डासांचे प्रमाण कमी होते किंवा ज्या ठिकाणी ते नसल्यात जमा होते अशा ठिकाणीही डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे. परिणामी, डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या विषाणूंचा प्रादुर्भाव भारतातच नाही तर जगभरात वाढला असल्याचे डॉ. जयालक्ष्मी श्रीधर सांगतात. याशिवाय जागतिक तापमानवाढीमुळे महिला व पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा धोका वाढला आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढले असून अल्पवयातच अवयव काम करेनासे होत आहेत. वायुप्रदूषण, हवामान बदल यामुळे हृदय, किडनी, यकृताचे आजार झपाट्याने वाढत आहेत. विशेषकरून तापमानवाढीमुळे दरवर्षी ६७ लाख मृत्यू होतात, असेही त्या म्हणाल्या.
एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे होणारा डेंग्यूचा प्रसार २८.६ टक्के तर एई अल्बोपिक्टस या डासामुळे होणारा डेंग्यूचा प्रसार २७.७ टक्क्यांनी वाढला आहे. जगभरात दरवर्षी डासांमुळे होणाऱ्या आजाराच्या विळख्यात ७० कोटी लोक सापडतात. दहा लक्ष लोक मृत्युमुखी पडतात. डेंग्यू या आजारामुळे दरवर्षी ३०.९० कोटी लोक प्रभावित होतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.