File Photo
मुंबई : राजकीय प्रश्नावंर नागरिकांत सर्वेक्षण, अंदाज, मतचाचणी आदी गोष्टींवर काम करणाऱ्या लोकपोलनं राज्यात केलेल्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला १४१ ते १५४, सत्ताधारी महायुतीला ११५ ते १२८ तर अपक्ष व इतर छोट्या पक्षांना ५ ते १८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या निष्कर्षानुसार महाविकास आघाडी सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जमवू शकेल असे दिसते.
लोकपोलने त्यांच्या एक्स अकाऊंटवर निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यात महाविकास आघाडी प्रथम तर महायुती दुसऱ्या क्रमांकावर राहील असे दिसते. लोकपोलनं हा सर्व्हे नेमका कसा केला याची माहिती दिली आहे. त्यानुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधून ५०० मतदार अशा प्रकारे जवळपास दीड लाख मतदारांचा सर्व्हेमध्ये समावेश होता.
मतदार निवडण्यासाठी प्रत्येक मतदारसंघातील ३० मतदान केंद्रे निवडली. २० ते ३० ऑगस्ट या १० दिवसांमध्ये हा सर्व्हे केला. राज्यातील एकूण आकडेवारीप्रमाणेच विभागनिहाय निकाल कसा असेल याचाही अंदाज या सर्व्हेमध्ये आहे.आकडेवारीनुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १४१ ते १५४ जागा मिळतील. सत्ताधारी महायुतीला ११५ ते १२८ जागा तर अपक्ष व इतर छोट्या पक्षांना ५ ते १८ जागा मिळतील.
विदर्भातल्या ६२ जागांपैकी महायुतीला १५ ते २०, मविआला ४० ते ४५ तर इतर १ ते ५ असं वर्गीकरण असेल. उत्तर महाराष्ट्रातील ४७ जागांपैकी महायुतीला २० ते २५, मविआलाही तेवढ्याच म्हणजे २० ते २५ व इतर ० ते २ जागा निवडून येतील. ठाणे-कोकणमधील एकूण ३९ जागांपैकी महायुतीला २५ ते ३०, मविआला ५ ते १० तर इतर १ ते ३ आमदार निवड़ून येऊ शकतात.
मुंबईतल्या ३६ मतदारसंघांपैकी १० ते १५ आमदार महायुतीचे, २० ते २५ आमदार मविआचे तर ० ते १ आमदार इतर पक्षांचे येऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रातील ५८ मतदारसंघांमध्ये महायुतीचे २० ते २५, मविआचे ३० ते ३५ तर १ ते ५ इतर आमदार येतील असा अंदाज आहे. मराठवाडा विभागातील ४६ मतदारसंघांपैकी १५ ते २० महायुतीचे, २५ ते ३० मविआचे तर ० ते २ इतर पक्षीय आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या विरोधात मत जाण्यासाठी ग्रामीण भागातील असंतोष, महागाई, भ्रष्टाचार, कायदा व सुव्यवस्था राखण्यातील अपयश, महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आणि बेरोजगारी या गोष्टींना मतदारांनी महत्त्व दिल्याचं निष्कर्षात म्हटलं आहे. काँग्रेस महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो, असंही यात म्हटलं आहे. त्याशिवाय, महाराष्ट्रातून बाहेर जाणाऱ्या प्रकल्पांचा मुद्दाही सर्व्हेमध्ये सहभाग घेणाऱ्या मतदारांसाठी महत्त्वाचा ठरला. निवडणुकीच्या जवळपास दोन महिने आधी करण्यात आलेल्या या सर्व्हेमधून निवडणुकीनंतर काय चित्र असू शकेल, याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.