संग्रहित छायाचित्र
भंडारा- गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांचा एक व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला असून त्यावर जोरदार टीका होत आहे. या व्हीडीओत पडोले मोटारीच्या बोनेटवरून प्रवास करत असल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे नुकसानीची पाहणी करण्यासाठी पडोले यांनी दौरा केला होता. व्हायरल व्हीडीओमध्ये खासदार पडोळे हे एका गाडीमधून प्रवास करताना दिसत आहेत. असे सांगितलं जात आहे की, ते शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. यावेळी एका रस्त्यावरून जात असताना पडोळे यांनी त्यांच्या गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास केला.
पडोळे प्रवास करत असलेल्या मार्गावरील रस्त्यावर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसत आहे. रस्त्यावर पाणी साचलेलं पाहून प्रशांत पडोळे यांची गाडी थांबताना दिसत आहे. त्यानंतर पडोळे गाडीच्या बोनेटवर बसलेले पाहायला मिळतात. एवढंच नाही तर रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून त्यांची गाडी जात असताना ते बोनेटवरच बसलेले आहेत. बोनेटवर बसून प्रवास केलेला हा व्हीडीओ त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काढल्याचे दिसते. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांसह अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. एकीकडे शेतकरी पुरस्थितीमुळे हैराण झाले असताना खासदारांनी अशी स्टंटबाजी करणे चुकीचे असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात येत आहे. अद्याप खासदार पडोळे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
प्रशांत पडोळे काँग्रेसचे भंडाऱ्याचे खासदार आहेत. राजकारणाआधी ते सामाजिक कार्यात सक्रिय होते. त्यांनी २००५ साली सक्रिय राजकारणात प्रवेश केला. काही दिवस त्यांनी भंडारा जिल्हा दुध संघाचं संचालक म्हणूनही काम केलं. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी साकोलीमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करत विजय मिळवला.