महाराष्ट्रात राख, गुजरातमध्ये रांगोळी का?
#मुंबई
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून शिवसेना कार्याध्यक्ष (उद्धव ठाकरे गट) उद्धव ठाकरे आक्रमक झाले असून माझ्या काळात राज्यात येणारे प्रकल्प भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर गुजरातला का गेले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. विकास प्रकल्पाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी का, असा प्रश्नही त्यांनी भाजपला विचारला आहे. गुरुवारी दुपारी मातोश्रीवर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. बारसूसाठी मी पत्र दिले ही वस्तुस्थिती आहे, पण लोकांची मान्यता असली तर हा प्रकल्प तेथे करायला हरकत नव्हती. आज लोकांच्या मनात शंका आहेत, प्रश्न आहेत त्यांची उत्तरं दिली गेली पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, नाणारमध्ये होणारा प्रकल्प रद्द झाल्यावर मी मुख्यमंत्री झालो. एकनाथ शिंदेंनी माझ्याकडे आग्रह धरला होता की हा प्रकल्प झाला पाहिजे. रिफायनरीमुळे होणारे प्रदूषण हे महाराष्ट्राला मान्य नाही असे मी म्हटले होते. त्याचवेळी मी जाहीर केले होते की जिथे लोकांची मान्यता असेल तर हा प्रकल्प तेथे न्या. आमचे सरकार यांनी पाडल्यानंतर गेल्या सहा-आठ महिन्यांत महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प मग ते वेदांता फॉक्सकॉन असो की अन्य प्रकल्प हे गुजरातला वळवले. जे मी नाणारवेळी बोललो होतो तेच माझे मत आजही कायम आहे. आता केवळ माझे पत्र नाचवत आहात, मग माझ्याच काळात येणारे प्रकल्प तुम्ही गुजरातला का जाऊ दिले? महाराष्ट्रात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी हे तुम्हाला करायचं आहे का, असा प्रश्न विचारत ठाकरेंनी टीकास्त्र सोडले आहे.
बारसूतील जमिनी सगळ्या उपऱ्यांनी विकत घेतल्या आहेत. मग त्या उपऱ्यांची सुपारी घेऊन तुम्ही माझ्याशी लढता आहात का ? भूमिपुत्रांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. भूमिपुत्रांच्या घरादारांवर उपऱ्यांचा वरवंटा तुम्हाला फिरवायचा आहे का? पोलिसांचं बळ का वापरत आहात? लोकांमध्ये जा, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. एवढेच विचारतो आहे की कुणी कुणाच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत. प्रकल्प चांगला असेल तर लोकांसमोर प्रकल्पाचं सादरीकरण करा. एक तर लोकांचे गैरसमज दूर करा किंवा प्रकल्प दूर करा. लोकांच्या डोक्यावर बंदूक टेकवून तुम्ही संमती घेत आहात आणि प्रकल्प चांगला आहे असे सांगता याला काय अर्थ आहे?
बारसूसाठी दबाव नव्हता
बारसूसाठी माझ्यावर दबाव वगैरे अजिबात नव्हता. मला वाटले होते की जर प्रकल्प चांगला असेल आणि लोकांनी होकार दिला तर प्रकल्पास तयारी दर्शवली होती. मात्र आता लोकांच्या मनात शंका, प्रश्न आहेत. त्याला उत्तरे दिली पाहिजेत. बारसूच्या लोकांना उत्तरे मिळालीच पाहिजेत, तो त्यांचा हक्क आहे असेही ठाकरेंनी म्हटलं आहे.
पवारांना सल्ला देऊ शकत नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा त्याग केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. याप्रश्नी ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला पक्षांतर्गत व्यवस्थापन काय असावं, हे ठरवण्याचा अधिकार असतो. मला वाटते की महाविकास आघाडीला कुठेही तडा जाईल अशी कोणतीही गोष्ट राष्ट्रवादीत घडेल असे मला वाटत नाही. मी त्यांना कोणता सल्ला देऊ शकत नाही. मी दिलेला सल्ला त्यांना पटला नाही तर काय करणार? उद्या त्यांचा निर्णय होऊ द्या. त्यानंतर काय ते बोलेन. महाविकास आघाडीला आमच्याकडून तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन. तसे मी काही बोलणार नाही किंवा करणार नाही. देशात हुकूमशाही येणार नाही असे मानणाऱ्या लोकांची एकता व्हायला हवी. मी व्यक्तीचा पराभव करायला मागत नाही, वृत्तीचा पराभव करायची इच्छा असते. त्यासाठीच हुकूमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं माझं म्हणणं आहे.
उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केवळ दोन वेळा मंत्रालयात जाणे आपल्याला आवडले नसल्याचा उल्लेख शरद पवार यांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात केला आहे. यावर ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केले हे जगजाहीर आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य वाटतो. यापलीकडे काही बोलणं योग्य नाही.