माधवी लता यांनी जिंकली मने; धनुष्यबाण मारतानाची कृती करत भाजप उमेदवारांच्या विजयाचे आवाहन
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार असून आता उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धुराळा उडाला आहे. रविवारी (१० नोव्हेंबर) सोलापुरात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ विश्व हिंदू परिषदेने माधवी लता यांची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत माधवी लता यांनी धनुष्यबाण मारतानाची कृती करत उपस्थितांची मने जिंकली.
लोकसभा निवडणुकीत हैद्राबाद येथून भाजपच्या उमेदवार राहिलेल्या माधवी लता यांनी एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात लढत दिल्याने त्या चर्चेत आल्या होत्या. या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी माधवी लता यांनी धनुष्यबाण मारतानाची कृती केल्याने त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. यामुळे हैद्राबाद येथील निवडणुकीची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी माधवी लता सोलापुरात दाखल झाल्या. सोलापुरात झालेल्या सभेत माधवी लता यांनी धनुष्यबाण मारतानाची कृती करत उपस्थितांची मने जिंकली. सोलापुरातील पूर्व भागात मोठ्या संख्येने तेलगू बांधव आहेत. त्यामुळे माधवी लता यांनी तेलगूमध्येच आपले भाषण केले. यावेळी उपस्थितांनी माधवी लता यांना धनुष्यबाणाची कृती करण्याची विनंती केली. त्यांनी ही कृती करताच सभेत एकच जल्लोष झाला. दरम्यान, सोलापुरातील तेलगू बहुल भागात आज माधवी लता या पदयात्रा करणार आहेत. या पदयात्रेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.