सावरकरांना भारतरत्न का देत नाही? संजय राऊतांचा अमित शाहांवर निशाणा, बाळासाहेबांवरील प्रेम खोटे असल्याचा आरोप

भाजप आणि शिवसेना पेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगले आहेत. त्यांच्या मनात बाळासाहेबांविषयी खोटे प्रेम नाही. ते मनापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. सावरकांना भारतरत्न देणे हे अमित शाह यांच्या हातात आहे. मात्र, ही मागणी ते का पूर्ण करत नाहीत, असा असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोंडित पकडले.

राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागायला लावण्याचे आव्हान अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते. उद्धव ठाकरे यांनी माफी मागून दाखवावी, असे म्हणत अमित शाह यांनी त्यांच्यावर टीका केली होती. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कलम ३७० प्रकरणांमध्ये अमित शाह हे खोटे बोलत असल्याचा आरोपदेखील यावेळी संजय राऊत यांनी केला. आमच्या शिवसेनेने कलम ३७० हटवण्याला पाठिंबा दिला होता, असा दावादेखील राऊत यांनी केला.

भाजप आणि शिवसेना पेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगले आहेत. त्यांच्या मनात बाळासाहेबांविषयी खोटे प्रेम नाही. ते मनापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचे कौतुक करत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपचे बाळासाहेबांवरील प्रेम हे खोटे असल्याचा दावादेखील राऊत यांनी केला आहे.

मविआला १६० ते १६५ जागा मिळण्याचा दावा

विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात किमान १६० ते १६५ जागा मिळत आहेत. मात्र आता काही लोक कुठून कुठून सर्वे करतील आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतील, हे सांगता येत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पैशांचे वाटप, ईव्हीएमचा विषय हरियाणाच्या निवडणुकीतदेखील आला होता. मात्र, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा आताचे सरकार येणार नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कृपेने बसलेले हे सरकार पुन्हा निवडून येणार नाही, याची आम्हाला खात्री असल्याचेदेखील त्यांनी म्हटले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत जाहीर झालेल्या सर्वेक्षणातील दावे संजय राऊत यांनी फेटाळून लावले आहेत. ‘‘सर्व्हे कुणाचेही आले तरी त्यावर विश्वास ठेवावा अशी स्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतही असे सर्व्हे आले होते. त्यात महाविकास आघाडीला १० जागाही मिळणार नाहीत. असा दावा करण्यात आला होता. पण आम्ही ३१ जागा जिंकल्या,’’ याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

भाजपने बॅनरवरून बाळासाहेबांचा फोटो काढावा : राऊत

आपला माल विकण्यासाठी व्यापारी नेहमी खोटे बोलत असतो. तसेच खोटे बोलण्याचे काम अमित शाह करत असतात. ते व्यापारी आहेत. त्यामुळे ते खोटे बोलत असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाजपने त्यांच्या बॅनरवरून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटवावा. त्यांना राज्यात पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येक पावलावर बाळासाहेब ठाकरे यांची गरज पडत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम असते तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला नसता. शिवसेना पक्ष चोरी केला नसता, त्याच्यावर डाका टाकला नसता, असे म्हणत संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर प्रति हल्ला चढवला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना विकली, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याची आवश्यकता नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

आएएनएस-मॅट्रिझच्या सर्व्हेत

मविआला १०६-१२६,

महायुतीला १४५-१६५ जागा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा वारू चौफेर उधळला आहे. सर्वच पक्ष आपापल्या विजयाचे दावे करत आहेत. पण आयएएनएस आणि मॅट्रिझने केलेल्या सर्व्हेमध्ये विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला केवळ १०६ ते १२६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणावर मविआच्या नेत्यांनी टीका केली आहे.

दुसरीकडे या सर्व्हेनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या महायुतीला १४५ ते १६४ जागा मिळण्याचा अंदाज यात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेक्षणामुळे सत्ताधारी महायुतीला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.  

या सर्व्हेमध्ये मुंबईतील ३६ पैकी १३ ते १७ जागा भाजप, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अवघ्या ५ ते ९ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही झुकते माप मिळण्याची चिन्हे आहेत. विशेषतः राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही मुंबईत किमान ४ जागा मिळतील, असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest