संग्रहित छायाचित्र
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ३०९ गावांमध्ये मुक्तिपथ आणि शक्तिपथ गाव संघटनेच्या नेतृत्वात मतदारांनी दारूबंदीला नाही म्हणणारा उमेदवार आम्हालाही नको, असा लक्षवेधी ठराव मंजूर केला आहे.
गेल्या ३१ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी टिकून आहे. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, महिला-पुरुषांनी अनेक आघाड्यांवर लढाई लढली आहे. त्यांच्या मते, निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे प्रलोभन घालून मत मागणाऱ्यांमुळे दारूबंदी तसेच विकासाला खीळ लागण्याची शक्यता आहे. म्हणून दारूबंदीचे समर्थन करणाराच उमेदवार आम्हाला हवा. ही बाब स्पष्ट करून घेण्यासाठी आम्ही सातत्याने जनजागृती करून ठराव मंजूर करून घेतला आहे.
गावातील काही मतदारांनी सांगितले की, ‘‘आमचे मत हवे असल्यास दारूबंदी समर्थनाचे लिखित वचन द्यावे, अशी मागणी आम्ही प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवाराकडे करणार आहोत. वचन न देणाऱ्या नेत्याला, उमेदवाराला आम्ही मत देणार नाही. एवढेच नव्हे तर दारू पिणाऱ्याला मतदान करणार नाही, असे आम्ही त्याला स्पष्टपणे बजावणार आहोत.’’