संग्रहित छायाचित्र
मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढणार असल्याचे समोर आले आहे. त्यांचा वैद्यकीय जामीन रद्द करण्याची मागणी करत ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नवाब मलिक यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. त्यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन देण्यात आला होता. आता त्यांची प्रकृती चांगली असून त्यांचा वैद्यकीय जामीन रद्द करावा, अशी मागणी ईडीने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
भाजपचा विरोध असतानादेखील अजित पवारांनी नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नवाब मलिक यांचे दाऊदसोबत संबंध असल्याचा आरोप भाजपने केला होता. तसेच त्यांना अटकदेखील करण्यात आली होती. असे असूनदेखील महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नवाब मलिक यांनी प्रवेश केला. एवढेच नव्हे तर अजित पवारांनी नवाब मलिक यांना उमेदवारीदेखील जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये या विषयावरून मतभेद उघड झाले. सध्या मलिक हे जामिनावर बाहेर आहेत. आता त्यांचा जामीनच रद्द करण्याची मागणी ईडीच्या वतीने करण्यात आली आहे.
नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. नवाब मलिक यांना २०२२ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांसोबत पैशांचे व्यवहार केल्याचा आरोप होता. ईडीचे पथक दाऊदसोबत पैशांचे व्यवहार आणि त्याच्या बहिणीसोबतच्या जमिनीच्या व्यवहाराचा तपास करत होते. मलिक हे अनेक दिवस तुरुंगात होते आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला होता.