संग्रहित छायाचित्र
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सभांना सुरुवात केली आहे. तसेच या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसादेखील खर्च केला जात आहे. दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराने फडणवीसांच्या तुलनेत चारपट खर्च केला असल्याचे समोर आले आहे.
दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी प्रचारासाठी आतापर्यंत २ लाख ९९ हजार ५८१ रुपये खर्च केले असल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी ६४ हजार १३६ रुपये खर्च करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत प्रफुल्ल गुडधे यांचे चार पटीपेक्षा जास्त खर्च असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीने जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे.
दक्षिण नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार गिरीश पांडव हे प्रचार खर्चाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. पांडव यांनी प्राचारावर आतापर्यंत ६ लाख ५६ हजार ६७५ रुपये खर्च केले आहेत. उत्तर नागपूरमधील भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांनी ४ लाख १७ हजार ६१७, तर मध्य नागपूर येथील प्रवीण दटके यांनी ३ लाख ५६ हजार ९८ रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, नागपूर शहरातील सहा मतदारसंघापैकी सर्वात कमी खर्च मध्य नागपूरमधील कॉंग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी केला. त्यांनी आतापर्यंत प्रचारासाठी ४४ हजार २४३ रुपये खर्च केला आहे.
मी पाकिस्तानातील उमेदवार आहे का?
एकीकडे उमेदवार प्रचारासाठी खर्च करत असून दुसरीकडे मात्र राजकारणही तापत असल्याचे दिसत आहे. पश्चिम नागपूरमधून भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे हे निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांना बाहेरचा उमेदवार असल्याचे म्हणत काँग्रेसकडून टीका होत आहे. यावर, ‘‘मी काय पाकिस्तानमधून आलेला उमेदवार आहे का?’’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच पश्चिम नागपूरमधील विद्यमान आमदार आणि कॉंग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हेदेखील दक्षिण नागपूरमध्ये राहतात आणि पश्चिम नागपूरमध्ये निवडणूक लढवतात, असे असताना मला बाहेरचे उमेदवार कसे म्हणू शकता, असा सवालही सुधाकर कोहळे यांनी विचारला आहे.