कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?
#मुंबई
राज्यातील वातावरण कमालीचे अस्थिर असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडत आहेत. शिंदे सरकार हे भाजपसाठी ओझे झाले आहे, अशी टीका ठाकरे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवारी (दि. २८) केली. दुसरीकडे, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीवर ओझे झाले आहेत. महाराष्ट्रदिनी होणारी मविआची वज्रमूठ सभा अखेरची असेल, असा दावा भाजप नेते नितेश राणे यांनी केला. हे आरोप-प्रत्यारोप पाहता ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,’ असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या घटनाक्रमांकडे बघितल्यास अनेक अनपेक्षित गोष्टी घडल्याचे दिसते. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर मागील वर्षी भाजपने एकनाथ शिंदेंना फोडून सत्तास्थापनेची संधी साधली. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर सद्यस्थितीत राज्यात प्रचंड राजकीय अस्थिरता आहे. अशा वातावरणात राजकीय टीका-टिप्पणी नेहमीप्रमाणे जोरात आहे. ‘‘महाराष्ट्रात भाजपला शिंदे सरकारचे ओझे झाले आहे. हे ओझे किती काळ खांद्यावर घेऊन फिरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. याबाबत मी चर्चा ऐकल्या आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून लगावला. राऊत यांच्या टीकेला तोडीस तोड उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीवरच उद्धव ठाकरेंचे ओझे झाले आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाला होणारी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा ही शेवटची सभा असेल. यानंतर वज्रमूठ सभा होणार नाही.’’
संजय राऊत यांनी नागपुरात झालेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. राऊत म्हणाले, ‘‘या रुग्णालयाविषयी मी माहिती घेतली. या चांगल्या प्रकल्पासाठी देवेंद्र फडणवीस यांचे मी कौतुक करतो. देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांचा कॅन्सरने मृत्यू झाला होता. त्या वेदनेतून त्यांनी नागपुरात भव्य असे कॅन्सर हाॅस्पिटल उभारले आहे. यामध्ये राजकीय टीका होऊ शकत नाही.’’
‘‘शरद पवार यांनी बारसूच्या संदर्भात स्थानिकांना विश्वासात घेण्याचा सल्ला राज्य सरकारला दिला होता. मात्र जनतेचा सरकारवर विश्वास नाही. उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्लीचा आग्रह असल्याने बारसूच्या जागेचा पर्याय आम्ही सुचवला होता. मात्र जनतेची इच्छा नसेल तर या ठिकाणीदेखील प्रकल्प नको, हीच आमची भूमिका आहे. बारसूच्या आसपास ज्या ज्या परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्या हट्टासाठी प्रकल्प याठिकाणीच करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे,’’ असे राऊत म्हणाले.
राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या केलेल्या कौतुकावरुन नितेश राणे म्हणाले, ‘‘एकाच दिवसात इतका फरक पडेल, असे वाटले नव्हते. संजय राऊत यांचा चेहरा उतरलेला होता. असे त्यांच्याशी लढण्यात मजा नाही. राऊत यांच्या भोंग्याचा डेसिबल कमी झाला. राऊत म्हणायचे मी पवारांचा माणूस आहे. मात्र, हे उद्धव ठाकरेचेदेखील नाहीत आणि शरद पवारांचेदेखील नाहीत. मग हे राजकारणातले लावारिस आहेत का?’’
संजय राऊत स्वतःला शिवसैनिक समजतात. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीखही माहित नाही. तो शिवसैनिक असण्याच्या बाता करतो. त्याला शिवसेनेबद्दल किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. राऊत ‘लोकप्रभा’त असताना बाळासाहेबांना शिव्या घालायचे. धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आहे. संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक शिवसेना नाव वापरत आहेत. हा निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा अपमान आहे. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असे नितेश राणे यांनी सांगितले.
वृत्तसंस्था