संग्रहित छायाचित्र
मुंबई मधील मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ समोर आला होता. ही घटना गुरुवारी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली. एका अज्ञात महिलेने फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली. तसेच फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून दिली. एव्हढंच नाही तर र्यालयाबाहेर असणाऱ्या कुंड्या देखील या अज्ञात महिलेने फेकल्या. हा सगळा गोंधळ घातल्यानंतर ही अज्ञात महिला त्यानंतर तिथून पसार झाली.
या घटनेमुळे थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याची चर्चा सुरू झाली. तर या घटनेनंतर लाडक्या बहिणीचा राग अनावर झाल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. ही महिला कोण होती? ते समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, मी माहिती घेतली आहे. ही कालची घटना आहे. त्या माहिलेने कार्यालयाचं नुकसान का केलं? तिचं म्हणणं नेमकं काय होतं? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ. उद्विग्नतेच्या भावनेने त्या महिलेने कार्यालयाचं नुकसान केलं का? त्या महिलेची व्यथा काही आहे का? ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न करू. कोणी जाणीवपूर्वक पाठवलंय का, हे आम्ही निश्चितपणे समजून घेऊ. फडणवीस पुढे म्हणाले, विरोधक निराश आणि हाताश झाले आहेत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. माझ्याकडे त्यांच्याविषयी बोलायला अनेक उदाहरणं आहेत पण ते खालच्या थरावर उतरले म्हणून माझ्यासारख्याने उतरायचं नसतं.