नळदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर-मादी धबधबा गुरुवारी रोजी प्रवाहित झाला आहे. त्यामुळे किल्ल्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Sep 2024
  • 12:07 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

ऐतिहासिक नर-मादी धबधबा सुरू झाल्याने संख्येत वाढ

धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय व नयनरम्य नर-मादी धबधबा गुरुवारी रोजी प्रवाहित झाला आहे. त्यामुळे किल्ल्यात पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील नर-मादी तसेच शिलक हे दोन्ही धबधबे सुरू झाले नव्हते. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांची त्यावेळी निराशा झाली होती. मात्र यावर्षी बोरी धरण पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस चांगला झाल्याने नळदुर्ग येथील बोरी धरण बुधवारी (२५ सप्टेंबर) पूर्ण क्षमतेने भरून धरणाचा सांडवा सुरू झाला होता. या सांडव्याचे पाणी पुढे बोरी नदीत जाते. या नदीवरील किल्ल्यातील शिलक आणि नर-मादी हे दोन्ही धबधबे सुरू होतात. यामुळेच गुरुवारी दुपारी नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यातील पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेले शिलक आणि नर-मादी हे दोन्ही धबधबे सुरू झाले आहेत. किल्ल्याच्या उत्तर बाजूने बोरी नदी किल्ल्यात वाहात येते. नदीला चंद्रकोरीचा आकार देऊन पुन्हा उत्तरेकडे वळविण्यात आले आहे. 

बोरी नदीच्या शेवटच्या टोकाला पूर्व-पश्चिम असा बंधारा अतिशय कल्पकतेने व भक्कमपणे बांधला आहे. बंधार्‍याच्या वरच्या बाजूला नदीच्या पुराचे पाणी वाहून जावे म्हणून दोन भले मोठे सांडवे तयार करण्यात आले आहेत. या दोन सांडव्यांनाच नर व मादी अशी नावे देण्यात आली आहेत. धबधब्यातील पाणी १०० फूट खाली फेसाळत जाऊन आदळते. हा डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण पाहण्यासाठी पर्यटक हा धबधबा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहतात. आता येत्या दोन दिवसांत किल्ल्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest