अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार; लोकांकडून पेढे वाटून आनंद साजरा, तर विरोधकांकडून चौकशीची मागणी

मुंबई – बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या बालिकावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत एन्काऊंटर झाला. एका क्रूरकर्म्याचा अंत झाला. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणानंतर उलटसूलट चर्चांना उधाण आले. अनेकांनी या एन्काऊंटरबाबत समाधान व्यक्त केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Sep 2024
  • 06:57 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई – बदलापूर येथे एका शाळेत चार वर्षांच्या बालिकावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत एन्काऊंटर झाला. एका क्रूरकर्म्याचा अंत झाला. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणानंतर उलटसूलट चर्चांना उधाण आले. अनेकांनी या एन्काऊंटरबाबत समाधान व्यक्त केले.

ज्या बदलापुरात ही घटना घडली तिथे फटाके लावण्यात आले, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. सोशल मीडियावर या घटनेचे कौतुक करणाऱ्या हजारो पोस्ट पडल्या. मात्र या घटनेनंतर राजकारण तापले. विरोधकांनी चौकशीची मागणी केली.

बदलापूर येथे एका नामांकित शाळेत अक्षय शिंदे हा तरुण सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. एक ऑगस्ट रोजी त्याची नियुक्ती झाली. आणि पंधरा दिवसात त्याने आपल्या विकृतीचे दर्शन घडवले. या शाळेत शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींनी आपल्या पालकांकडे तक्रार केली. आपल्या नाजूक ठिकाणी वेदना होत आहेत, असे त्यांनी पालकांना सांगितले. पालकांनी शाळेवर मोर्चा नेला. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली. असा एकूण घटनाक्रम होता.

ही घटना घडताच दुसऱ्या दिवशी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आला. हजारो लोक अचानक ट्रॅकवर जमा झाले. सुमारे नऊ तास बदलापूरहुन मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प करण्यात आली. उत्स्फूर्तपणे झालेल्या या आंदोलनात अचानक राजकीय बॅनर आले. पोलिसांवर दगडफेक झाली. शाळेची तोडफोड झाली. राजकीय प्रतिक्रिया झपाट्याने उमटू लागल्या. आणि आंदोलनाच्या मागे लोक भावना नसून राजकीय हेतू असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणातील आरोपीचा आंध्रप्रदेश प्रमाणे एन्काऊंटर करण्याची मागणी केली. सुषमा अंधारे यांचीही तशीच मागणी होती. इवल्याशा जीवांना छळणाऱ्या त्या नराधमाला भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही मागणी करण्यात आघाडीवर होते.

बालिकांच्या शोषणाची तक्रार दाखल होताच बदलापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मुख्य आरोपी अक्षय शिंदे जिथे राहत होता त्या गावातील नागरिकांनी त्याच्या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला. त्याची तीन लग्न झाली होती, असे उघडकीस आले आणि विभक्त पत्नींपैकी एका पत्नीने त्याच्या विरोधात शारीरिक शोषणाची तक्रार दाखल केली. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले असता त्याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या या कृतीचे ठाम शब्दात समर्थन केले. पोलीस स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणारच, असा दावा फडणवीस यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी चकमकीतील पोलिसांना बक्षीस जाहीर केले. राज यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही पोलीस कारवाईचे समर्थन केले. अनेक ठिकाणी घटनेच्या समर्थनार्थ पेढे वाटप करण्यात आले.

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह चकमकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोलिसांची बाजू घेतली. सोशल मीडियावर ” देवाचा न्याय” या नावाने एक हॅशटॅग ट्रेंड झाला. पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करणाऱ्या हजारो पोस्ट या अंतर्गत नागरिकांनी टाकल्या. पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांनी कौतुक केले. दोन चिमूरड्यांना न्याय मिळाल्याची भावना सामूहिक रित्या व्यक्त झाली होती.

विरोधकांनी मात्र या घटनेनंतर चौकशी करण्याची मागणी केली. सुषमा अंधारे यांनी पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप केला. तसेच मविआचे नेते शरद पवार,  जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करत पोलिसांवर संशय व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या या भूमिकेवरून काहींना त्यांना ट्रोल केले. खूप वर्षांनी पोलिसांनी उत्तम काम केले, तुम्हाला आरोपी पुळका का, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला. नराधम अक्षय शिंदे याचे समर्थन कशासाठी, असा सवालही अनेकांनी उपस्थित केला. चार वर्षांच्या बालिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अक्षय शिंदे च्या प्रकरणात सुद्धा विरोधक राजकारण शोधत आहेत, असा आरोपही करण्यात आला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest