... तर पोलीस टाळ्या वाजवणार नाहीत

मुंबई: बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. पण आता हे एन्काऊंटर ठरवून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Sep 2024
  • 12:01 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी फडणवीसांनी केले पोलिसांचे समर्थन

मुंबई: बदलापूरमधील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. पण आता हे एन्काऊंटर ठरवून करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. अक्षय शिंदेच्या पालकांनीही तसाच दावा केला आहे. त्या संदर्भात चर्चांना उधाण आलेले असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेत पोलिसांच्या कृतीला पाठिंबा असल्याचे विधान केले आहे. तसेच, तपासातून यातील सत्य लोकांसमोर येईल, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांच्या कारवाईचे जोरकसपणे समर्थन केले. आमचा एन्काऊंटर पद्धतीवर विश्वास नाही, मात्र पोलिसांवर बंदूक रोखली तर पोलीस टाळ्या वाजवणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पहिली गोष्ट म्हणजे आमचा एन्काऊंटर पद्धतीवर विश्वास नाही. माझे म्हणणे आहे की कोणत्याही न्यायप्रक्रियेत कायदा पाळला गेला पाहिजे. कोणत्याही गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणात तपासात समोर येईल की बंदूक कशी काढली गेली? ती आरोपीच्या हातात कशी गेली? वगैरे. पण जर कुठला गुन्हेगार बंदूक हिसकावून आपल्या पोलिसांवर बंदूक रोखत असेल, तर पोलीस टाळ्या वाजवू शकत नाहीत. ते गोळी झाडतील आणि त्यांनी गोळी झाडली. त्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी बंदूक चालवली. यातील सत्य तपासातून सविस्तरपणे समोर येईलच, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

काही लोक म्हणतात इथेच गोळी का मारली, तिथेच का मारली? अरे तुमच्यासमोर जर बंदूक घेऊन कुणी उभा राहिला आणि तुमच्यावर गोळी झाडत असेल, तर तुम्ही काय हे बघत राहणार का की इथे गोळी मारायची की तिथे? असे होत नाही. जिथे गोळी लागते तिथे मारावी लागते. या प्रकरणाची १०० टक्के न्याय्य चौकशी होईल. हा गुन्हेगार न्यायालयीन कोठडीत होता. फक्त माझी अपेक्षा ही आहे की काल घटना घडली, आज त्याची चौकशी सुरू झाली आहे. आजच इतक्या प्रश्नांची उत्तरे कशी मिळणार? म्हणे डोक्यालाच गोळी कशी लागली, पायालाच कशी लागली नाही? पुढे का लागली? मागे का लागली? वगैरे बोलले जात आहे.  मात्र असे नाही होत. अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानेही खूप स्पष्ट टिप्पणी केली आहे. मला वाटते आपण पोलिसांना काम करू दिले पाहिजे. सीआयडी आपला तपास करेल. तपासातून सर्व गोष्टी बाहेर येतील, अशा शब्दांत फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. 

तो काय साधुसंत होता का?

बदलापूरमध्ये घटना घडल्यानंतर पूर्ण तपास करून आम्ही न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानंतर ही दुसरी केस आली. या व्यक्तीने तीन लग्न केली. त्याच्या एका पत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. त्या संदर्भात ही नवीन चौकशी चालू होती. मला वाटते जर कुणाला नियोजन करूनच एन्काऊंटर करायचं असेल तर तो लगेच करेल. लोकांचा राग आहे तेव्हा करेल. एवढा वेळ गेल्यानंतर कुणी नियोजन करून या गोष्टी कशाला करेल? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. पोलिसांवर त्याने गोळी झाडली. तो गुन्हेगारी वृत्तीचा माणूस होता. तीन लग्न, आपल्या पत्नींना त्रास देतो, छोट्या मुलींसोबत असले कृत्य करतो. तो काही साधुसंत तर नव्हता. त्याने जर पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर माझे पोलीस शांत बसणार नाही. ते उत्तर देतील. त्यांनी उत्तर दिले, असेही फडणवीसांनी यावेळी नमूद केले. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest